लोकसभेसाठी दक्षिण गोव्यात उतरवण्याची तयारी
पणजी : गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, काँग्रेसने आता पुन्हा त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी देऊन त्यांना सक्रिय केलेले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठीही सध्या त्यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातून त्यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची पुनर्रचना केली असून, गोव्याचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची समितीवर कायमस्वऊपी निमंत्रित म्हणून नेमणूक केलेली आहे. समितीच्या सदस्यपदी 30, सरचिटणीसपदी 9, तर कायमस्वऊपी निमंत्रितपदी 18 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसच्या देशभरातील दिग्गज नेत्यांचा यात समावेश असून, त्यात गोव्यातून गिरीश चोडणकर यांच्या नावाचाही समावेश करण्यात आलेला आहे.
भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही येत्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकारी समितीची पुनर्रचना केलेली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करू न देण्याचा निर्धार काँग्रेस नेतृत्वाने केलेला आहे. त्यासाठी देशभरातील नव्या दमाच्या नेत्यांना यावेळी कार्यकारी समितीमध्ये संधी देण्यात आलेली आहे. राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आणि समर्थकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. गिरीश चोडणकर यांच्यासारख्या सामान्य माणसाला कार्यकारी समितीवर स्थान मिळाले आहे. या समितीवर अनेक प्रमुख नेते देशाच्या उन्नतीसाठी भूमिका बजावत आहेत. त्यात आता गोव्याला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. याबद्दल आपण आमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. गेल्या अनेक वर्षांपासून गिरीश चोडणकर हे बहुजन समाजाच्या हितासाठी काम करत आहेत. केंद्रीय स्तरावर चोडणकर यांना संधी देणे हा या समाजाचा सन्मान आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.
गिरीश चोडणकर हाच योग्य पर्याय
गिरीश चोडणकर यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातून उतरवल्यास वेगळे चित्र दिसेल. कारण चोडणकर हे विश्वासू नेते आहेत. राष्ट्रीय काँग्रेसमध्येही त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लोकसंपर्क आणि पक्षासाठी कार्य करण्याची वृत्ती चोडणकर यांच्या अंगी असल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. भाजपला टक्कर देण्यासाठी गिरीश चोडणकर हेच योग्य पर्याय असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.









