काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आज होणार निश्चित
पणजी : भाजपने दक्षिण गोव्यासाठी लोकसभा उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्षाने आता सावध पवित्रा घेतला असून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आज बुधवारी दि. 27 मार्च रोजी होत असलेल्या बैठकीत गोव्याचे दोन्ही उमेदवार ठरणार आणि नंतर ते जाहीर करण्यात येणार अशी माहिती उपलब्ध झाली आहे. काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यात अॅड. रमाकांत खलप व सनिल कवठणकर यांची तर दक्षिण गोव्यासाठी गिरीश चोडणकर व फ्रान्सिस सार्दिन यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवार अंतिम करण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार एल्टन डिकॉस्ता दिल्लीत पोहोचले असून उमेदवार निवडीच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. संभाव्य इच्छुक उमेदवारांची नावे यापूर्वीच पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे देण्यात आली असून त्या नावांवर चर्चा कऊन शेवटी एका उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानास आता फक्त एक महिना 10 दिवस म्हणजे 40 दिवसच बकी राहिले आहेत. अनेक दिवस उमेदवारी लटकल्यामुळे संभाव्य उमेदवारही कंटाळल्याचे समोर आले आहे.









