मुख्यमंत्र्यांकडून पुलाच्या कामाला गती : बैठकीत अधिकाऱ्यांना दिले निर्देश
पणजी : चोडण, मये, नार्वेसह संपूर्ण डिचोली तालुक्यातील लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या चोडणपासून साल्वादोर द मुंद या बहुप्रतीक्षित पुलाचे बांधकाम अखेर मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याकामी पुढाकार घेतला असून अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भूसंपादन प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे तसेच अन्य सोपस्कारही शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. नियोजित पुलाच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद शेट, मंत्री रोहन खंवटे, साबांखा मुख्य अभियंता, उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुलाच्या कामाचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
250 कोटी खर्चाचा पूल
सुमारे 200 मीटर लांबीचा हा पूल तब्बल 250 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. त्यासंबंधी गत 2023-24 च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली होती.पुलाचे बांधकाम साधनसुविधा महामंडळ करेल तर त्याचे जोडरस्ते आणि अन्य कामांचा खर्च साबांखा करणार आहे. त्यासंबंधी लवकरच निविदा जारी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
प्रत्येक निवडणुकीत होत होता प्रचाराचा मुद्दा
गत कित्येक विधानसभा निवडणूक प्रचारात मये मतदारसंघातील उमेदवारांकडून या पुलाचे आश्वासन देण्यात येत होते. गत निवडणुकीसुद्धा प्रत्येक उमेदवाराने हेच आश्वासन प्राधान्याने दिले होते. तरीही काम मात्र मार्गी लागत नव्हते. परिणामी लोकांच्या नशिबातील फेरीबोट प्रवास काही सुटत नव्हता. एखाद्या संकटसमयी किंवा आपत्कालीन स्थितीत तर लोकांचे हालच होत होते. आता लवकरच या सर्व जाच आणि त्रासातून त्यांची सुटका होणार आहे.
जमीन मालकांसाठी भरपाई
जमीन मालकांना देण्यात येणाऱ्या भरपाईची रक्कम म्हणून 12.5 कोटी ऊपये ईडीसीकडे जमा करण्यात आले आहेत. तसेच या पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांसह साल्वादोर द मुंद आणि अन्य सर्व रस्त्यांचेही ऊंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या या पुलाशी संबंधित कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुलाचा आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी यावेळी दिली.