वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
अमेरिकेतील लॉस एंजिल्स आणि क्युबामधील 2023 च्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप पात्र फेरीच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा पुरुष अॅथलिट प्रवीण चित्रावेलने पुरुषांच्या तिहेरी उडीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. तसेच लॉस एंजिल्स स्पर्धेत भारताचे धावपटू अविनाश साबळे आणि पारुल चौधरी यांनी पुरुष व महिलांच्या 5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नवे राष्ट्रीय विक्रम केले.
क्युबामधील स्पर्धेत भारताचा अॅथलिट प्रवीण चित्रावेलने पुरुषांच्या तिहेरी उडीत शनिवारी 17.37 मी. चे अंतर नोंदवित नवा राष्ट्रीय विक्रम केला. हवानातील या स्पर्धेमध्ये चित्रावेलची कामगिरी दर्जेदार झाली. 21 वर्षीय चित्रावेलने या क्रीडा प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम करताना 2016 साली रेंजित माहेश्वरीने नोंदविलेला 17.30 मी. चा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. 2023 च्या बुडापेस्ट विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्रतेची मर्यादा 17.20 मी. आहे. गेल्या वर्षी चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत चित्रावेलने सुवर्णपदक मिळविताना 17.18 मी. अंतर नोंदविले होते. चित्रावेल सध्या क्युबामध्ये विदेशी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे झालेल्या विश्व अॅथलेटिक्स काँटीनेंटल टूरवरील स्पर्धेत भारताचे धावपटू अविनाश साबळे आणि पारुल चौधरी यांनी 5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नवे राष्ट्रीय विक्रम केले. महिलांच्या 5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत पारुल चौधरीने 13 वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. लॉज एंजिल्समध्ये झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या 5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळेला 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 13 मि. 19.30 सेकंदाचा अवधी घेत गेल्या वर्षी नोंदविलेला स्वत:चाच विक्रम मागे टाकला. 1992 साली या क्रीडा प्रकारात भारताच्या बहादुर सिंगने 13 मिनिटे 29.70 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. पण पारुल चौधरीने हा विक्रम मोडला. पुरुषांच्या 3 हजार मी. स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी साधली. लॉस एंजिल्समधील या स्पर्धेत पुरुषांची 5 हजार मी. धावण्याची शर्यत कूपर टेरीने जिंकली. त्याने 13 मि. 12.73 सेकंदांचा अवधी घेतला. तर महिलांच्या 5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत जोसेटी अँड्रीव्हजने विजेतेपद मिळविताना 14 मि. 43.36 सेकंदाचा अवधी घेतला.









