शहरासह ग्रामीण भागातील जनतेचा सहभाग
बेळगाव : महामानव आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडली. निळे ध्वज, निळे फेटे परिधान करून कार्यकर्ते या चित्ररथ मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. जय भीमच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ आणि ‘जय भीम’ अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. आचारसंहिता असल्यामुळे कोणीही राजकीय व्यक्ती या मिरवणुकीत दाखल झाली नाही. मात्र, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला चालना देण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथे या मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर या मिरवणुकीचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह दलित संघटनेच्या नेत्यांनी उद्घाटन केले. या मिरवणुकीमध्ये चित्ररथ देखाव्यांसह कार्यकर्त्यांनी आपला सहभाग दर्शविला. अत्यंत चैतन्यमय आणि उत्साही वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. दुपारी उद्घाटन झाले तरी चारनंतरच चित्ररथ मिरवणुकीमध्ये अधिक चित्ररथ देखावे दाखल झाले होते. ‘जय भीम’चा जयघोष करत तरुणवर्ग आणि तरुणी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेबाबतचे देखावे याचबरोबर दलितांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लढ्याचे देखाव्यांचे सादरीकरण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. त्या घटनेमध्ये केवळ दलितच नाही तर बहुजन समाजाला एक वेगळा न्याय मिळावा, यासाठी तरतूद केली. त्यामुळेच आज आम्ही सारे वाटचाल करत आहोत. याबाबतचे देखावे देखील यामध्ये सादर करण्यात आले होते. धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट, कित्तूर चन्नम्मा सर्कल त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे चित्ररथ मिरवणूक देखाव्यांची सांगता होत होती. मिरवणुकीमध्ये विविध प्रकारची कलापथके, झांजपथके, डीजे त्याचबरोबर पारंपरिक वाद्यांचा सहभाग देखील दिसून आला. विविध चौकांमध्ये या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी या सर्वांचे स्वागत करण्यात येत होते. थंड सरबत, तसेच इतर पेये देण्यात येत होती. या मिरवणुकीमध्ये लहान मुलांसह महिलांनीही मोठा सहभाग दर्शविला होता. शहराबरोबरच उपनगर व ग्रामीण भागातून काही चित्ररथ देखावे सामील झाले होते. यावेळी तरुणाई चित्ररथ देखाव्यासमोरील वाद्यांसमोर थिरकत होती. या मिरवणुकीच्या रस्त्यावर मोठी गर्दी दिसून येत होती. अनेक संघटनांनी स्वखर्चातून पाणी, शीतपेये उपलब्ध करून दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मराठी गाणीच अधिक प्रमाणात लावण्यात आली होती. यामुळे मऱ्हाठमोळीच मिरवणूक असल्याचे दिसून येत होते. आंबेडकरांच्या जीवनावरील मराठी पोवाडे देखील लावण्यात आले होते.
आचारसंहिता असल्यामुळे राजकीय मंडळी अनुपस्थित
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये राजकीय मंडळी मोठ्या संख्येने दरवर्षी सहभागी होतात. मात्र, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेमुळे राजकीय मंडळींनी मात्र पाठ फिरविली होती. एरवी पुढच्या रांगेत थांबणारे राजकीय मंडळींना आवर घालावा लागला. उद्घाटन देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते केले जाते. मात्र, यावर्षी अधिकाऱ्यांनीच या मिरवणुकीचे उद्घाटन देखील आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक असल्यामुळे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम असो किंवा चित्ररथ मिरवणूक असो, त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









