मेजर ध्यानचंद सिक्स ए साईड हॉकी स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित मेजर ध्यानचंद सिक्स ए साईड आंतरशालेय हॉकी स्पर्धेत जी. जी. चिटणीस, एम. आर. भंडारी संघांनी विजेतेपद तर सेंट जॉन्स काकतीने दुहेरी मुकुट पटकावला. कॅम्प येथील मेजर बी. ए. सय्यद मेदानावर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडादिनी आयोजिलेल्या सिक्स ए साईड हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष साजीद शेख, एन. बी. नदाफ, गोपाळ खांडे, खलिक बेपारी, जी. ए. जहांगीरदार, एम. जे. तेरणीकर, उत्तम शिंदे, गणपत कडोलकर, राजशेखर मोतीबेन्नूर, सुधाकर चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटात मुलामुलींच्या 15 संघांनी भाग घेतला होता. प्राथमिक गटातील मुलांचा अंतिम सामना सेंट जॉन्स काकती संघाने एम. आर. भंडारी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. काकतीतर्फे रवीने एकमेव गोल केला. मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट जॉन्स काकतीने जी. जी. चिटणीस संघाचा टायब्रेकरमध्ये 1-0 असा निसटता पराभव करून विजेतेपद पटकावले. काकतीच्या निलमने एकमेव गोल केला.
माध्यमिक गटात मुलांच्या विभागात अंतिम सामन्यात एम. आर. भंडारी अ संघाने भंडारी ब संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात अ संघाचा कर्णधार प्रवीण जुट्टणवरने 17 व्या मिनिटाला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवली. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला दुर्गेशच्या पासवर प्रवीण जुट्टणवरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. शेवटी हा सामना अ संघाने 2-0 असा जिंकला. मुलींच्या अंतिम सामन्यात जी. जी. चिटणीस अ संघाने चिटणीस ब संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला अ संघाच्या स्नेहा तोरणकरने पहिला गोल केला. तर दुसऱ्या सत्रात अ संघाच्या रिया जांबोटकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 32 व्या मिनिटाला रियाच्या पासवरती नेहा तोरणकरने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे साजीद शेख, एन. बी. नदाफ, गोपाळ खांडे, रंगरेज शकील कोतवाल, इब्राहिम शेख, शाबाज काबी, समीउल्ला नाईक, जहागीरदार व तेरणीकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र व पदके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीडीएचएच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









