दुर्मीळ पक्ष्यांचे लवकरच आगमन : पक्षीसंग्रहालयामुळे पक्षीप्रेमी-पर्यटकांना उत्सुकता
बेळगाव : भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात नव्याने दुर्मीळ प्रजातीचे पक्षी दाखल होणार आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार आहे. पक्ष्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून पर्यटकांना लवकरच प्राणी संग्रहालयात रंगीबेरंगी पक्षी पाहावयास मिळणार आहेत. शहरापासून अवघ्या 12 कि. मी. अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. संग्रहालयात बिबटे, वाघ, सिंह, मगर, अस्वल, कोल्हा, लांडगा, तरस, हरिण, सांबर, चितळ, कासव यासह ससा, मोर, घुबड, पोपट, जंगली कोंबडी यासारखे पक्षीही ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये आता नव्याने दुर्मीळ पक्ष्यांची भर पडणार आहे. यामध्ये कॉर्मोरंट, किंगफिशर, कॉमन ग्रे, हॉर्नबिल, पेलिकन, पेटेंड स्टार्क यासारख्या पक्ष्यांचा समावेश राहणार आहे.
या पक्ष्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र पक्षी संग्रहालय निर्माण करण्यात येत आहे. सात स्वतंत्र खोल्या बांधण्यात आल्या आहेत. म्हैसूर बन्नेरघट्टा येथील प्राणी संग्रहालयातून पक्षी आणले जाणार आहेत. यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच भुतरामहट्टीत आगळे वेगळे पक्षी पहावयास मिळणार आहेत. पक्षीप्रेमी आणि पर्यटकांची दुर्मीळ पक्षी पाहण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या प्राणी संग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे संग्रहालयाचा महसूलदेखील सुटीच्या दिवशी एक लाखापर्यंत जात आहे. डिसेंबर ते जानेवारी हा पर्यटनाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्यटकांबरोबर विविध शाळांच्या शैक्षणिक सहलीही येऊ लागल्या आहेत. आता प्राणी संग्रहालयात स्वतंत्र पक्षी संग्रहालय सुरू होणार असल्याने एकाच छताखाली दुर्मीळ पक्षीही पाहता येणार आहेत. संग्रहालयात विविध वन्यप्राण्यांबरोबर पक्ष्यांची संख्या वाढणार असल्याने पक्षीप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोरोनामुळे अंतर्गत विकासकामे आणि नवीन प्राणी आणि पक्ष्यांच्या येण्याला स्थगिती मिळाली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर हळूहळू वन्यप्राणी आणि पक्षी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे संग्रहालयात वन्यप्राण्यांबरोबर दुर्मीळ पक्ष्यांची संख्याही वाढणार आहे.
प्राणी संग्रहालयाची वेळ
प्राणीसंग्रहालय मंगळवार वगळता दररोज सकाळी 10 ते 5 या वेळेत सर्वांना खुले राहणार आहे. शिवाय नोकरदारवर्गाची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय सुटीदिवशीही संग्रहालय खुले राहणार आहे. प्रौढांसाठी 50 तर लहान मुलांसाठी 20 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे.
वन्यप्राणी-पक्ष्यांचा आनंद लुटता येणार
संग्रहालयात नव्याने पक्षी संग्रहालयासाठी सात खोल्या निर्माण करण्यात आल्या आहेत. म्हैसूर येथील संग्रहालयातून लवकरच दुर्मीळ पक्षी आणले जाणार आहेत. त्यामुळे झूमध्ये वन्यप्राण्यांबरोबर विविध पक्ष्यांचे दर्शन होणार आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच वन्यप्राणी आणि पक्ष्यांचा आनंद लुटता येणार आहे.
– के. एन. वण्णूर (आरएफओ, भुतरामहट्टी)
विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात पक्ष्यांचे स्वतंत्र संग्रहालय निर्माण केले जात असल्याने पक्षीप्रेमींना एकाच ठिकाणी विविध पक्षी पाहता येणार आहेत. शिवाय शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासही करता येणार आहे. पक्षीप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण वाढणार आहे.
– अमन उसुलकर (पक्षीप्रेमी)









