वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही युती-आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चेने वेग पकडलेला असतानाच एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान यांनी जागावाटपाबाबत एक महत्त्वाची अट घातली आहे. चिराग पासवान यांनी माध्यमांशी बोलताना सर्व पक्ष समर्थक आणि नेत्यांना अधिक जागा हव्या आहेत. जागांच्या संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे, असे माठे वक्तव्य केले आहे.
लोकसभेप्रमाणेच आम्हाला विधानसभेतही 100 टक्के स्ट्राइक रेट कायम ठेवायचा आहे. आम्ही जितके उमेदवार देणार आहोत ते सर्व विजयी व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. माझ्यासाठी ज्या जागा महत्त्वाच्या आहेत त्या मी युतीला 100 टक्के जिंकून देऊ शकतो, असा माझा विश्वास आहे. त्यामुळेच जागावाटप करताना योग्य विचार व्हायला हवा, असे चिराग पासवान म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही आघाडींमध्ये संघर्ष सुरू आहे. एकीकडे, काँग्रेस, व्हीआयपी आणि डावे पक्ष आरजेडीकडून अधिक जागांची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे, जेडीयू-भाजपसह एचएएम, एलजेपी आणि आरएलएसपी यांची प्रभावी जागा निवडण्यासाठी धडपड सुरू आहे.









