वृत्तसंस्था / पाटणा
संयुक्त जनता दलाचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल, तर नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी लवकरात लवकर राजकारणात येण्याची आवश्यकता आहे, या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या विधानावर लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पास्वान यांनी टीका केली आहे. राजकारणात यायचे किंवा नाही याचा निर्णय निशांत कुमार यांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यामुळे इतरांनी त्यांना सल्ले देण्याची उठाठेव करण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन पास्वान यांनी केले.
तेजस्वी यादव यांना इतकी सविस्तर महिती असेल तर त्यांनी या महितीचा स्रोत स्पष्ट करावा. तसेच संयुक्त जनता दलाच्या भवितव्याविषयी प्रत्यक्ष नितीश कुमार यांना भेटून चर्चा करावी. बाहेरुन सल्ले देऊ नयेत. निशांत कुमार यांना राजकारणात याचे असेल तर ते स्वबळावर निर्णय घेऊ शकतात. तसेच त्यांना केव्हा राजकारणात यायचे आहे, ते ठरविण्याचा अधिकारही त्यांनाच आहे. तेजस्वी यादव यांनी या संदर्भात विधाने करुन जनतेची दिशाभूल करु नये, असाही टोला चिराग पास्वान यांनी तेजस्वी यादव यांना शनिवारी बोलताना लगावला आहे.









