वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मलेशियातील शहा आलम येथे 13 ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या बॅडमिंटन आशियाई सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून चिराग आणि लक्ष्य या सेन बंधुंचा भरतीय संघात समावेश करण्यात आला आहे. चिरागने अलिकडेच वरिष्ठांच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
क्वालालंपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन तसेच चिराग शेट्टी भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. चिराग शेट्टीने आतापर्यंत विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने गेल्या महिन्यात गौहत्ती येथे झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय चॅम्पियन्स बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होऊन जेतेपद मिळविले होते. गौहत्तीमधील स्पर्धेत लक्ष्य सेनला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली होती.









