चिपळूण :
वीजनिर्मितीनंतर कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याने महिलावर्गाला दिलासा मिळत आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने वाशिष्ठी नदीच्या काठावर खेर्डी-माळेवाडी व गोवळकोट येथे जॅकवेल बांधल्या आहेत. खेर्डी जॅकवेल परिसरात बंधारा बांधण्यात आल्याने येथे कायम पाणी असते. मात्र सध्या ग्रॅव्हीटी योजनेच्या साठवण टाक्यांची डीबीजे महाविद्यालय परिसर, खंड आदी भागात कामे सुरू असल्याने येथून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तर गोवळकोट, गोवळकोटरोड, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड आदी भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली गोवळकोट जॅकवेल कायम समस्यांच्या गर्तेत अडकली आहे.
- काही दिवसात पाणीपुरवठा नियमित
वाशिष्ठी नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने वीजनिर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी जॅकवेलकडे येतच नाही. त्यामुळे नगर परिषदेचे अधिकारी व काही लोकप्रतिनिधींनी या बाबत धरण व्यवस्थापनशी चर्चा केल्यानंतर गेल्या २ दिवसांपासून वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे बदललेले वेळापत्रक रूळावर येताना दिसत आहे. त्यातच ज्या भागात मागणी होईल, त्या भागाला नगर परिषद टँकरने पाणी देत असल्याने सध्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पाण्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसात पाणीपुरवठा नियमित होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहित खाडे यांनी सांगितले.








