मुंबई \ ऑनलाईन टीम
चिपळूणमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील 48 तासांत खेड आणि चिपळूणमध्ये तब्बल 300 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आज सकाळी एनडीआरएफच्या व कोस्ट गार्डच्या टीम पोहोचल्या आहेत. मदतकार्याला सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोयना धरणाच्या खालच्या धरणाचं पाणी सोडावं लागलं. जर असं केलं नसतं तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. कालपासून रेड अलर्ट दिला होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल याचा अंदाज नव्हता, अशं वडेट्टीवार म्हणाले.
300 मिलिमीटर पाऊस म्हणजे सर्व यंत्रणा कोलमडण्यासारखं आहे. आज सकाळी एनडीआरएफच्या दोन टीम पोहोचल्या आहेत. कोस्ट गार्डच्या टीमही पोहोचल्या आहेत. मदतकार्याला सुरुवात झाली आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. एअरलिफ्ट करण्यासाठीही मदत मागितली आहे. खेड आणि चिपळूणचे दोन्ही रस्ते बंद झाल्यामुळे संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत एकाही मृत्यूची माहिती नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले. निसर्गापुढे मर्यादा असतात. मदत पोहोचवण्यातही मर्यादा येत आहेत. पण आम्ही मदत पोहोचवत असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.