चिपळूण :
कर्नाटकातील चित्रदुर्ग इथे महाराष्ट्राच्या एसटी व चालकाला काळे फासण्याची घटना घडली. या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे खबरदारी म्हणून चिपळूण आगारातून सोडण्यात येणारी चिपळूण-बेळगाव एसटी फेरी कोल्हापूरपर्यंत नेण्यात येत आहेत.
शनिवारी कर्नाटकातील चित्रदुर्ग इथे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील एसटी व चालकाला काळे फासले. या घटनेविषयी महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. चिपळूण आंगाराचा विचार करता अनेक प्रवासी हे बेळगाव येथे जात असल्याने त्याची प्रवासादरम्यान गैरसोय होवू नये, यासाठी आगारातून पहाटे ५ ते दुपारी ३ या वेळेत चिपळूण-बेळगाव एसटी फेरी सोडण्यात येते. याचा निश्चित फायदा त्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाला आहे, असे असताना या घटनेनंतर चिपळूण आगारातून सोडण्यात येत असलेल्या चिपळूण-बेळगाव एसटी फेऱ्या खबरदारी म्हणून कोल्हापूरपर्यंत नेण्यात येत आहेत.








