पिवळ्या समुद्रात मोठी दुर्घटना : 55 नौसैनिक मारले गेल्याची भीती
वृत्तसंस्था/ बीजिंग
पिवळ्या समुद्रात चिनी पाणबुडी एका चेन आणि अँकरला धडकली आहे, यामुळे पाणबुडीची ऑक्सिजन सिस्टीम निकामी ठरल्याचे समजते. चीनने प्रत्यक्षात ही चेन आणि अँकर ब्रिटिश आणि अमेरिकेच्या पाणबुड्यांना संकटात आणण्यासाठी समुद्रात सोडला होता. परंतु त्याचीच पाणबुडी या सापळ्यात अडकली आहे. पाणबुडीवरील ऑक्सिजन सिस्टीम पूर्ववत करण्यासाठी 6 तासांचा कालावधी लागला, यादरम्यान पाणबुडीवरील 55 नौसैनिकांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली होती. चीनने या दोन्ही दुर्घटनांबद्दल अद्याप मौन बाळगले आहे.
पाणबुडीतील ऑक्सिजन सिस्टीम अपयशी ठरल्याने एका नौसैनिकाचा मृत्यू झाला. यामुळे अन्य चालक दल देखील मृत्युमुखी पडला आहे. मृतांमध्ये चिनी पीएलए नौदलाची पाणबुडी ‘093-417’चा कॅप्टन आणि आणखी 21 अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृतपणे चीनने ही घटना फेटाळली आहे. चीनने स्वत:च्या दुर्घटनाग्रस्त पाणबुडीसाठी आंतरराष्ट्रीय मदत मागण्यासही नकार दिला आहे.
21 ऑगस्ट रोजी घडली दुर्घटना
21 ऑगस्ट रोजी पिवळ्या समुद्रात एका मोहिमेला मूर्त स्वरुप देताना चिनी पाणबुडी दुर्घटनाग्रस्त झाली होती. ही घटना 8 वाजून 12 मिनिटांनी घडली आणि यामुळे 55 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 22 अधिकारी, 7 अधिकारी कॅडेट, 9 ज्युनियर ऑफिसर्स आणि 17 नौसैनिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये कॅप्टन कर्नल जू योंग-पेंग देखील सामील आहेत असे ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून उघड करण्यात आले आहे. चीनची टाइप 093 पाणबुडी मागील 15 वर्षांपासून नौदलात सामील आहे. ही पाणबुडी 351 फूट लांब आणि टॉरपीडोने युक्त आहे. टाइप 093 चीनच्या अत्याधुनिक पाणबुड्यांपैकी एक असून यातून फारसा आवाज येत नाही.
पाणबुडीसोबत काय घडले असावे?
पाणबुडीच्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने 55 नौसैनिकांचा हायपोक्सियाने मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या पाणबुडींना अडकविण्यासाठी चिनी नौदलाकडून वापरण्यात येणारी चेन आणि अँकरमध्ये चिनी पाणबुडीच अडकली. यामुळे चिनी पाणबुडीची यंत्रणा निकामी झाली आणि यानंतर त्याच्या दुरुस्तीस आणि समुद्राच्या पृष्ठभागावर येण्यास 6 तासांचा कालावधी लागला आहे. एका भयानक बिघाडानंतर पाणबुडीवरील ऑक्सिजन सिस्टीम चालक दलासाठी जीवघेणी ठरली आहे. पाणबुडीच्या दुर्घटनेची घटना चीनच्या शेडोंग प्रांतात घडल्याचे मानले जात आहे.
चीनकडून मौन
चिनी पाणबुडीच्या दुर्घटनेची अद्याप पुष्टी देण्यात आलेली नाही. चीनने दुर्घटनेच्या वृत्तांना पूर्णपणे चुकीचे ठरविले आहे. तर ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने याप्रकरणी टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. पाणबुडी दुर्घटनेचे वृत्त डिफेन्स इंटेलिजेन्सवर आधारित असल्याचे ब्रिटिश प्रसारमाध्यमांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









