सैन्याने उचलले पाऊल : चिनी सैनिकांची भाषा समजणार : सीमा वादावर नवी रणनीति
वृत्तसंस्था/ लेह
भारतीय सैन्याने चीनसोबत लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनची भाषा मंदारिन बोलणारे अधिकारी तैनात केले आहेत. हे सर्व अधिकारी भारतीय सैन्याच्या टेरिटोरियल आर्मीचा हिस्सा आहेत. पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या भारत-चीन वादाला सोडविण्याकरता त्यांची मदत घेतली जाणार आहे.
मंदारिन भाषेवर चांगली पकड आणि अन्य आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या 5 अधिकाऱ्यांना ऑगस्टमध्ये टेरिटोरियल आर्मीत सामील करण्यात आले ओ. पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत सीमेवर होणाऱ्या बैठकीत मदत करण्यासाठी सीमावर्ती चौकीवर तैनात असणार आहेत. टेरिटोरियल आर्मी यापूर्वीच स्वत:च्या उत्तर, पूर्व आणि मध्य कमांडमध्ये मंदारिन अभ्यासक्रम चालवित आहे. याकरता सैन्याने अनेक विद्यापीठांसोबत करार देखील केला आहे.
अनेक टप्प्यांमध्ये परीक्षा
मंदारिन भाषा बोलण्यात पारंगत या 5 अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सोपी नव्हती. उमेदवारांना अनेक टप्प्यांना सामोरे जावे लागले आहे. पहिली फेरी जानेवारीमध्ये सुरू झाली होती आणि काही महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाली. यात मंदारिन भाषेवर पकड राखणाऱ्या विविध उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा आणि मग मुलाखतीला सामोरे जावे लागले आहे. अखेरीस 5 अधिकाऱ्यांची ऑगस्टमध्ये भरती झाली आहे. यात सामील अधिकाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्षे इतके आहे.
बैठकीदरम्यान द्विभाषिकांची भूमिका
या 5 अधिकाऱ्यांना लडाखमध्ये फॉरवर्ड बेसमध्ये तैनात करण्यात आले आहे. भारत-चीन सीमा बैठकीदरम्यान भारत आणि चिनी सैन्यादरम्यान बालिंगुअल (दोन भाषा जाणणारे)ची भूमिका पार पाडणार आहेत. परंतु त्यांना सीमेवर होणाऱ्या बैठकीसोबत अन्य जबाबदाऱ्यांकरताही तैनात केले जाऊ शकते. भारत-चीन यांच्या सैन्यस्तरीय चर्चेची 19 वी फेरी ऑगस्ट महिन्यात पार पडली होती. दोन्ही देशांदरम्यान 5 मुद्द्यांवरून तणाव आहे.
3 वर्षांपूर्वी गलवानमध्ये संघर्ष
भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सुमारे 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर 38 चिनी सैनिक मारले गेले होते. परंतु चीनने स्वत:च्या जीवितहानीची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. गलवान नदीच्या काठावर भारतीय सैनिकांनी तात्पुरता पूल निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. याला चीनच्या सैन्याने विरोध दर्शविला होता. तर दुसरीकडे चीनने या क्षेत्रात अवैध स्वरुपात मूलभूत सुविधांच्या निर्मितीस सुरुवात केली होती. तसेच चीनने या क्षेत्रात स्वत:च्या सैनिकांची संख्या वाढविली होते. यातूनच दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती.









