39 जण बेपत्ता : बचावकार्य सुरू
वृत्तसंस्था/ बीजिंग
हिंदी महासागरात चिनी नौका मासेमारीसाठी पोहोचली होती, परंतु ही नौका दुर्घटनाग्रस्त झाली आहे. ही नौका बुडाली असून यातील सर्व 39 जण बेपत्ता आहेत. नौकेवरील कर्मचाऱ्यांमध्ये चीनचे 17, इंडोनेशियाचे 17 आणि फिलिपाईन्सचे 5 नागरिक सामील आहेत. नौका बुडण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान ली कियांग यांनी बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी विविध मंत्रालयांना आदेश दिले आहेत.
लू पेंग युआन यू 028 असे या नौकेचे नाव असल्याचे समजते. ही दुर्घटना मंगळवारी घडली आहे. चीनला या नौकेवरील कर्मचाऱ्यांच्या शोधाकरता ऑस्ट्रेलिया तसेच अन्य देशांचे बचाव पथक देखील मदत करत आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, फिलिपाईन्समधील दूतावासांसोबत समन्वय साधण्यासाठी एक आपत्कालीन यंत्रणा सुरू केली आहे.









