रक्षाबंधन सणाची उलाढाल तब्बल 12 हजार कोटी रुपयांची
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यंदाचा रक्षाबंधनाचा पवित्र सण भारतीयांनी ‘देशभक्त आणि आत्मनिर्भर’ पद्धतीने साजरा केल्याचे दिसून आले आहे. कारण यावेळी चीनी राख्यांची खरेदी भारतीय भगिनींनी केली नाही. चीनी राख्या बाजारातून अक्षरश: गायब झालेल्या दिसत होत्या. भारतीय व्यापाऱ्यांनीही चीनी राख्यांची आयात आणि विक्री केली नाही. त्यांच्या स्थानी भारत निर्मित राख्यांनाच मागणी प्राप्त झाली होती.
यंदाच्या रक्षाबंधनाच्या सणाची देशभरातील उलाढाल किमान 12,000 कोटी रुपयांची झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी उलाढाल आहे. यापूर्वी 2019 मध्ये 3 हजार 500 कोटी रुपये, 2020 मध्ये 5 हजार कोटी रुपये, 2021 मध्ये 6 हजार कोटी रुपये, 2022 मध्ये 7 हजार कोटी रुपये आणि 2023 मध्ये 8 हजार 500 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. इतिहासात प्रथमच यंदा ही उलाढाल 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.
प्रचंड प्रमाणात खरेदी
यंदा राखी खरेदीत मोठाच उत्साह दिसून आला. चीनी राख्या नाकारण्यात आल्या. परिणामी व्यापाऱ्यांनीही भारतीय राख्यांचीच विक्री केली. विविध प्रकारांच्या राख्यांना भगिनींनी प्राधान्य दिले. त्यांच्यात नागपूर निर्मित खादीची राखी, जयपूरची सांगानेरी कला राखी, पुण्याची बीज राखी, सतनाची ऊनी राखी, वनवासींनी साकारलेली बांबूची राखी, आसामची चहाच्या पानांची राखी, कोलकात्याची तागाची राखी, मुंबईची रेशमी राखी, केरळची खजूर राखी, कानपूरची मोती राखी, बिहारची मधुबनी आणि मैथिली कला राखी, बेंगळूरची पुष्प राखी आणि पुदुच्चेरीची मऊ दगडाची राखी यांचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय तिरंगा राखी, वसुधैव कुटुंबकम राखी आणि भारतमाता राखीलाही मागणी होती.
ऑनलाईन खरेदीचाही विक्रम
यंदा राखी खरेदी ऑन लाईन करण्याकडे मोठा कल होता. एकंदर राखी खरेदीपैकी 30 टक्क्यांहून अधिक राख्या ऑन लाईन खरेदी करण्यात आल्या असाव्यात अशी शक्यता आहे. तसेच रक्षाबंधनाच्या सणात भेटवस्तूंची देवाण घेवाणही यंदा मोठ्या प्रमाणात झाल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.









