अजित डोभाल यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चीनचे विदेश व्यवहार मंत्री वांग यी हे भारताच्या दौऱ्यावर येणार असून त्यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या आधी वांग यी हे भारतभेटीवर येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या व्यापार शुल्क धोरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे भेट आहे.
2020 मध्ये लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यापासून पुढची चार वर्षे भारत आणि चीन यांच्यातील संबंध दुरावलेले होते. तथापि, काही महिन्यांपूर्वी लडाख सीमेवरील परिस्थिती पूर्ववत करण्यात दोन्ही देशांच्या यश आले आहे. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे काही दिवसांपूर्वी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना भेटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जिनपिंग यांना भेटणार आहे.
चर्चा काय होणार ?
वांग यी आणि अजित डोभाल यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. ही चर्चा अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणावर आणि त्याच्या परिणामांवर होणार का, हा कळीचा प्रश्न आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून चीनवरही 30 टक्के शुल्क लावले आहे. भारत आणि चीन हे दोन्ही देश अमेरिकेशी व्यापार करार करण्यासंबंधी त्या देशाशी चर्चा करत आहेत. मध्यंतरीच्या काळात अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करार झाल्याचीही चर्चा होती. तथापि, अशा कराराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार करार मात्र अद्याप रखडलेलाच आहे. भारत रशियाकडून खरेदी करत असलेले इंधन आणि अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारताची बाजारपेठ मोकळी करुन देणे, या दोन मुद्द्यांवर चर्चेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पुन्हा 3 महिन्यांचा कालावधी
अमेरिकेने चीनवर 30 टक्के व्यापारी शुल्क लावलेले असले तरी व्यापार कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधीही दिला आहे. पूर्वीही तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. तो 12 ऑगस्टला संपत होता. तो पर्यंत व्यापार करार झाला नाही, तर चीनवर 145 टक्के कर लावला जाणार होता. तथापि, अमेरिकेने चीनला आणखी 3 महिने सूट दिली आहे.
सावधानता आवश्यक
अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणामुळे भारत आणि चीन एकमेकांच्या जवळ येण्याची प्रक्रिया दिसून येत असली, तरी भारताने सावधानतेने पावले टाकावीत, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेशी भारताचा मोठा व्यापार आहे. चीनशीही व्यापार असला, तरी चीनची निर्यात भारताला मोठ्या प्रमाणात होत आहे. या उलट भारताची अमेरिकेला निर्यात अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीपेक्षा अधिक आहे. हा समतोल बिघडू नये याची दक्षता भारतनेही घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन या क्षेत्रातील अनेक तज्ञांनी केले.









