युद्धनौकांद्वारे देखील नजर ः तैवानशी चर्चा करणार अमेरिकेच्या संरक्षण कंपन्या
वृत्तसंस्था/ तैपैई
चीनने पुन्हा तैवानला चहुबाजूने घेरले आहे. यासंबंधीची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. महिन्याच्या प्रारंभी 3 दिवसांपर्यंत करण्यात आलेल्या युद्धसरावानंतर चीनने गुरुवारी पुन्हा 6 युद्धनौकांद्वारे तैवानवर नजर ठेवली आहे. तसेच चिनी लढाऊ विमानांनी तैवानला चहुबाजूने घेरले आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या या कृत्याला चिथावणीपूर्ण ठरविले आहे. चीनची 19 लढाऊ विमाने तैवानच्या अत्यंत नजीक पोहोचली होती असे संरक्षण मंत्रालयाने नकाशाद्वारे सांगितले आहे.
तैवाननजीक पोहोचलेल्या चिनी विमानांमध्ये रशियन बनावटीची 5 सुखोई एसयू-30 तर चौथ्या पिढीतील 2 शेनयांग जे-16 विमाने तसेच टीबी-001 ड्रोन सामील होता. अमेरिकेच्या अनेक संरक्षण कंपन्या तैवानच्या दौऱयावर येणार असल्याची माहिती समोर आल्यावर चीनने ही आगळीक केली आहे. अमेरिकेच्या कंपन्या शस्त्रास्त्रविक्रीसंबंधी तैवानच्या कंपन्यांसोबत चर्चा करणार आहेत. चीनने यावर आक्षेप घेतला आहे.
अमेरिका जगात शस्त्रास्त्रांची विक्री करून स्वतःच्या नफ्यासाठी युद्ध लादतात, तैवानने अमेरिकेला आमंत्रित करणे म्हणजे हिंस्त्र श्वापदाला स्वतःच्या घरी बोलाविण्याचा प्रकार आहे. यामुळे तैवानमध्ये धोका वाढणार असल्याचे चीनने म्हटले आहे. अमेरिका-तैवानच्या मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सच्या संबोधनाची सुरवात अमेरिकेच्या नौदलाचे माजी कमांडर स्टीवन रुडर करणार आहेत.
अमेरिकेने दशकांपासून वन चायना पॉलिसीचे समर्थन केले आहे, परंतु तैवानच्या मुद्दय़ावर अमेरिकेचे धोरण वेगळे आहे. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका त्याच्या रक्षणासाठी युद्धात उतरणार असल्याचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.