काँग्रेस आमदाराचे पंतप्रधानांना पत्र
वृत्तसंस्था/ ईटानगर
राष्ट्रीय सुरक्षेला वाढत्या धोक्याचा दाखला देत अरु णाचल प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे एरिंग यांनी चिनी क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
सीसीटीव्हीच्या वापराच्या विरोधात लोकांना जागरुक करण्यासाठी एक अभियान चालविण्यात यावी अशी मागणी एरिंग यांनी केली आहे. चिनी सीसीटीव्ही हे ड्रॅगनचे डोळे आणि कान आहेत. चिनी सीसीटीव्ही देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत असे एरिंग यांनी म्हटले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चीन पाळत ठेवत आहे. चिनी सीसीटीव्ही पॅमेऱ्यांचा वापर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. सद्यकाळात चीन सातत्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आक्रमकता दाखवत आहे, अशा स्थितीत चीन आमच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या मूलभूत स्वरुपावरही आक्रमण करत आहे. भारताने चीनकडून उद्भवलेल्या या धोक्याला रोखण्यासाठीही पावले उचलावीत असे आमदार एरिंग यांनी म्हटले आहे.
देशात सध्या 20 लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील 90 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हे चिनी सरकारची मालकी असलेल्या कंपन्यांकडून तयार करण्यात आलेले आहेत. सीसीटीव्ही नेटवर्कमध्ये वापरला जाणार इंटरनेट प्रोटोकॉल आणि डीव्हीआर देखील चिनी हॅकर्स हॅक करू शकतात असे एरिंग यांनी या पत्रात नमूद कले आहे.









