उपग्रहीय प्रतिमांमधून स्थिती स्पष्ट, भारत सावध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लडाखच्या विवादित क्षेत्राच्या सीमेपासून काहीशा आतल्या भागात चीन मोठा वायुतळ उभा करत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येत असून उपग्रहीय प्रतिमांमधून ही स्थिती स्पष्ट झाली आहे. या संबंधात अद्याप भारत सरकारने थेट प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसली, तर भारत सावधपणाने या हलचालींचा अभ्यास करीत आहे, अशी माहिती या संबंधात देण्यात आली आहे. हा तळ अभेद्य बनविण्याचे प्रयत्न चीनकडून केले जात आहेत, असे दिसून येते. भारताच्या गुप्तचर संस्थांचेही या तळाच्या उभारणीकडे सूक्ष्म लक्ष आहे.
याच भागात 2020 मध्ये भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या होत्या. गलवानचा रक्तरंजित संघर्षही या भागात झाला होता. या भागापासून 110 किलोमीटर अंतरावर चीनचा हा वायुतळ आकाराला येत आहे. भारतासाठी महत्वाची बाब म्हणजे या तळावर चीन क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्राचीही उभारणी करत आहे. भविष्यकाळात भारत आणि चीन यांच्यात सशस्त्र संघर्ष झाल्यास या तळाचा चीनला उपयोग होईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
गुप्तचरांचाही अहवाल
चीनच्या या हालचालींकडे भारताच्या गुप्तचर विभागाचेही लक्ष आहे. या तळावर क्षेपणास्त्रे डागणारी वाहने आणली जाण्याची शक्यता आहे. अशा वाहनांसाठी च्या सुविधा आवश्यक असतात, त्यांची निर्मितीही या तळावर करण्यात येत असल्याची माहिती गुप्तचरांकडून संरक्षण विभागाला देण्यात येत आहे. गेल्या एक वर्षापासून या क्षेत्रात बांधकामाची गती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. 2020 पासून 2024 पर्यंत चाललेल्या लडाख संघर्षाच्या काळात उभारणीचा प्रारंभ झाला होता.
सुरक्षित तळ असल्याचा दावा
चीनचा हा वायुतळ कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहील अशा पद्धतीने बांधण्यात येत आहे, असे तज्ञांचे मत आहे. या तळावर क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा स्थापन करण्यात येत आहे. या तळावरुन चीन भारतावर हल्ला करु शकेल. पण भारत या तळावर हल्ला करु शकणार नाही, असा दावा केला जातो. तथापि, भारताने तो नाकारला असून कोणत्याही लक्ष्याचा भेद करण्याची भारताची क्षमता आहे, असे स्पष्ट करण्यात आले. चीनच्या या तळाची विशेष चिंता करण्याचे कारण नाही. भारताचीही व्यवस्था सज्ज आहे, असेही काही तज्ञांचे मत आहे.
पेंगाँग सरोवरानजीक
लडाखला लागून असलेल्या तिबेटमधील पेंगाँग सरोवरानजीक चीनची ही बांधकामे होत आहेत. गेल्या जुलैमध्ये प्रथम त्यांचे दर्शन उपग्रहीय प्रतिमांमधून झाले आहे. असा एक तळ या पूर्वीच उभारण्यात आला असून दुसऱ्या तळाचे बांधकाम वेगाने करण्यात येत आहे. अमेरिकेच्या व्हेंटॉर या अवकाश गुप्तचर संस्थेने प्रथम यासंबंधातील इशारा दिला होता. या तळावर चीनची सर्वात प्रभावी मानली जाणारी, दीर्घ पल्ल्याची एच क्यू 9 ही भूमीवरुन आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात, असे या अवकाश गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे.
दूरसंचार नेटवर्कचीही व्यवस्था
या तळावर चीनच्या सेनेसाठी दूरसंचार नेटवर्कची उभारणीही केली जात आहे. यासाठी वायर्ड डाटा कनेक्शन सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. हे नेटवर्क एच क्यू 9 या विमानविरोधी क्षेपणास्त्रांच्या सुलभ प्रक्षेपणासाठी निर्माण करण्यात येत आहे. भारताने चीनवर प्रतिहल्ला केल्यास आणि त्यासाठी युद्ध विमानांचा उपयोग केल्यास ही एच क्यू 9 क्षेपणास्त्रे भारताच्या विमानांना रोखतील, अशी चीनची अटकळ आहे. या सर्व घडामोडींकडे भारताने सावधानतेने पहाण्याची आवश्यकता असून आपल्या संरक्षणासाठी लडाख भागात अशाच प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करुन चीनला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता अनेक तज्ञांनी व्यक्त केली.









