पुणे : आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची पूर्वतयारी आढावा बैठक आज झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, लक्ष्मण जगताप हे जनमानसात अतिशय लोकप्रिय होते. आपल्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान कायमस्वरूपी निर्माण केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र तरीही गाफिल न राहता, पक्षाने ‘थिंक इन अँडव्हान्स, थिंक इन डिटेल’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअनुषंगाने काम सुरू केले आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाने तीन समिती स्थापन केल्या असून, त्यात संघटनात्मक कामांसाठी पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या नेतृत्वात एक समिती काम करेल. तसेच पोटनिवडणुकीच्या व्यवस्थेसाठी व्यवस्थापक प्रमुख म्हणून बापू काटे यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नामदेव ढाके हे त्यांना साहाय्यक म्हणून काम करतील. त्यासोबतच महेश लांडगे यांच्या नेतृत्वात एक राजकीय समिती स्थापन केली असून, लांडगे यांच्या नेतृत्वात चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील.








