वृत्तसंस्था/ पॅरिस
चीनच्या लि वेनवेनने महिलांच्या हेविवेट विभागात (81 किलोवरील गट) आपले वर्चस्व कायम राखत वेटलिफ्टिंगमध्ये चीनला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही तिने सुवर्ण जिंकले होते.
वेनवेनने एकूण 309 किलो वजन उचलले. रौप्य मिळविणाऱ्या दक्षिण कोरियाच्या पार्क ह्यो जेआँगने 299 किलो वजन उचलले. वेनवेनपेक्षा तब्बल दहा किलो वजन जास्त असल्याने जेआँगने स्नॅच आणि क्लीन व जर्कमध्ये शेवटचा प्रयत्न केला नाही. जेतेपद मिळविल्यानंतर वेनवेनने तिच्यासमोर किरकोळ दिसणाऱ्या प्रशिक्षक वु मेइजिन यांना तिने उचलून घेतले तेव्हा प्रेक्षकांत हास्यकल्लोळ उठला होता. ग्रेट ब्रिटनच्या एमिली कॅम्पबेलने कांस्यपदक मिळविले. रौप्यविजेत्या पार्कपेक्षा तिने 11 किलो कमी वजन उचलले.









