वृत्तसंस्था/भुवनेश्वर (ओडीशा)
येथे झालेल्या 28 व्या आशियाई टेबल टेनिस सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनच्या स्पर्धकांनी पुरूष आणि महिलांच्या विभागात आपले निर्विवाद वर्चस्व राखताना दुहेरी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेमध्ये चीनच्या स्पर्धकांनी पुरूष आणि महिलांच्या विभागात आपल्या कामगिरीत सातत्य तर राखलेच पण त्यांच्या नव्या पिढीतील टेबल टेनिसपटूंची या स्पर्धेत ओळख करुन दिली. पुरूषांच्या सांघिक विभागातील अंतिम सामन्यात चीनने हाँगकाँग (चीन) संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करुन सुवर्णपदक पटकाविले.
या लढतीमध्ये चीनच्या टॉपसिडेड लीन शिडाँगने एकेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या तिंगचा 11-8, 11-4, 11-4 असा एकतर्फी पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात चीनच्या द्वितीय मानांकीत वेंग चुक्वीनने हाँगकाँगच्या चेन बेडवीनचे आव्हान 12-10, 11-9, 5-11, 14-12 असे संपुष्टात आणत आपल्या संघाला 2-0 अशी बढत मिळवून दिली. या लढतीमध्ये वेंगला तिसऱ्या गेममध्ये हार पत्करावी लागली होती.
तिसऱ्या आणि शेवटच्या लढतीमध्ये चीनच्या सातव्या मानांकीत लियांग जिंगकुनने हाँगकाँगच्या येऊ गोचा 13-11, 11-6, 12-10 असा फडशा पाडत आपल्या संघाला 3-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला. या अंतिम लढतीमध्ये हाँगकाँगचे स्पर्धक चीनच्या तुलनेत खूपच निस्तेज वाटले. महिलांच्या विभागात चीनने जपानचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात चीनच्या वेंग मेनयुने जपानच्या होनोका हेशीमोटोचा 11-3, 11-6, 11-3 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केल्याने चीनने 1-0 अशी आघाडी जपानवर मिळविली.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जपानच्या सन येंगशाने जपानच्या मिवा हेरीमोटोवर 11-9, 11-5, 11-7 अशी मात केली. या विजयामुळे चीनने या लढतीत 2-0 अशी भक्कम आघाडी जपानवर मिळविली. त्यानंतर तिसऱ्याआणि शेवटच्या सामन्यात चीनच्या कुई मॅनने जपानच्या हिना हेयाताचे आव्हान 11-8, 11-6, 11-9 अशा सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणत या स्पर्धेत चीनला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. 2026 साली लंडन येथे होणाऱ्या विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचे पुरूष आणि महिला संघ पात्र ठरले आहेत. टेबल टेनिस मानांकनात भारतीय पुरूष संघ सहाव्या तर महिला संघ आठव्या स्थानावर आहेत.









