वादग्रस्त ठिकाणी बैठक असल्याचा दावा : भारताने दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रीनगरमध्ये 22-24 मे या कालावधीत जी-20 ची बैठक होणार आहे. या बैठकीत सामील होण्यास चीनने शनिवारी नकार दिला आहे. चीन या बैठकीत सामील होणार नसल्याचा कयास यापूर्वीच वर्तविला जात होता, जो शनिवारी खरा ठरला आहे. चीनच्या विदेशमंत्रालायने अधिकृत वक्तव्य जारी करत बैठकीवर बहिष्काराची पुष्टी दिली आहे. वादग्रस्त क्षेत्रावर कुठल्याही प्रकारच्या जी-20 बैठकीला चीनचा पूर्ण विरोध असल्याचे चीनच्या विदेशमंत्रालयाचे प्रवक्ते वांग वॅनबिन यांनी म्हटले आहे.

चीनच्या या वक्तव्यावर भारताने आक्षेप दर्शविला आहे. आम्ही आमच्या क्षेत्रात बैठकांचे आयोजन करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहोत असे भारताने चीनला सुनावले आहे. यापूर्वी मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशात जी-20 ची बैठक आयोजित करण्यात आली होती, तेव्हाही चीनने या बैठकीत भाग घेतला नव्हता आणि तेव्हा पाकिस्तानने चीनच्या या बहिष्काराचे समर्थन केले होते.
काश्मीरमध्ये होणाऱ्या जी-20 बैठकीच्या विरोधात चीन आणि पाकिस्तान प्रत्येकवेळी एकत्र दिसून आले आहेत. चालू महिन्याच्या प्रारंभी चीन आणि पाकिस्तान दोघांनीही संयुक्त वक्तव्य जारी करत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. कुठल्याही एकतर्फी कारवाईला टाळत संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावांनुसार या प्रश्नावर तोडगा काढला जावा असे चीनने पाकिस्तानचा बचाव करत म्हटले होते.
तुर्किये अन् सौदीच्या भूमिकेकडे लक्ष
एकीकडे चीनने या बैठकीपासून अंतर राखले आहे, तर आणखी काही देशांनी बैठकीत सामील होण्याची तयारी अद्याप दर्शविलेली नाही. चीनसोबत तुर्किये आणि सौदी अरेबियाने देखील श्रीनगरमध्ये होणाऱ्या जी-20 च्या पर्यटन विषयक बैठकीत भाग घेण्यासाठी नोंदणी केलेली नाही. नोंदणीची अंतिम मुदत 22 मेपर्यंत असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये उच्चस्तरीय बैठक
तुर्किये आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश ओआयसीचे सदस्य आहेत. जी-20 ची बैठक आयोजित करण्याच्या भारताच्या निर्णयाच्या संदर्भात चीन आणि तुर्कियेची भूमिका फारशी आश्चर्यकारक नाही. परंतु सौदी अरेबियाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. मागील काही काळात सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील संबंध अत्यंत वृद्धींगत झाले आहेत. तसेच कलम 370 हद्दपार करण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतल्यावर सौदी अरेबियाने प्रतिकूल प्रतिक्रिया दिली नव्हती. यातून मुस्लीम जगतात एक संदेश पोहोचला होता. तर ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये हा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ठरणार आहे.
मोठ्या संख्येत विदेशी प्रतिनिधींचा सहभाग
श्रीनगरमध्ये जी-20 टूरिझम वर्किंग ग्रूपच्या तिसऱ्या बैठकीत सुमारे 100 प्रतिनिधी भाग घेतील अशी अपेक्षा आहे. यापूर्वी ही बैठक गुलमर्ग येथील स्की रिसॉर्टमध्ये प्रस्तावित होती. परंतु नंतर हे ठिकाण बदलण्यात आले होते. सुरक्षेमुळे नव्हे तर अन्य कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.









