2024 मध्ये 140 कोटी राहिली लोकसंख्या : ड्रॅगनची वाढली चिंता
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या लोकसंख्येत सलग तिसऱ्या वर्षी घसरण झाली आहे. 2024 च्या अखेरीस देशाची लोकसंगया 140 कोटी राहिली आहे. देशाची लोकसंख्या मागील वर्षाच्या तुलनेत 13 लाखाने कमी झाली आहे. लोकसंख्येत सातत्याने घट होत असल्याने जिनपिंग सरकारची चिंता वाढली आहे.
चीनच्या लोकसंख्येत घट होण्यामागील कारण प्रजनन दर खालावणे आहे. चीनने अनेक वर्षांपूर्वी स्वत:च्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक मूल धोरण लागू केले होते. देशाची लोकसंख्या आता वृद्ध होत असून काम करू शकणाऱ्या लोकांची संख्या कमी होत अहे. जन्मदर वाढत नसल्याचे चीनच्या सरकारकडून जारी अहवालात म्हटले गेले आहे.
लोकसंख्या कमी होण्याची मोठी कारणं
चीनची लोकसंख्या कमी होण्याची कारणेही समोर आली आहेत. तेथे युवा विवाह करण्यास विलंब लावत आहेत, कारण ते स्वत:चे भविष्य, नोकरीची सुरक्षा आणि वाढत्या राहणीमान खर्चावरून चिंतेत आहेत. तर युवांनी विवाह केला तरीही ते मुलांना जन्म घालणे टाळत आहेत. तर दुसरीकडे चीनमध्ये लोकांचे आयुर्मान वाढले आहे. प्रजनन दर न वाढल्याने चीनची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेला देश होण्याची कामगिरी केली आहे. भारताची लोकसंख्या मागील वर्षी 142.86 कोटी इतकी नोंद झाली. तर चीनची लोकसंख्या 140 कोटी राहिली आहे. लोकसंख्येत घट होत असलेल्या देशांमध्ये आता जपान अन् पूर्व युरोपमधील देशांच्या गटात चीनचा समावेश झाला आहे.
एक मूल धोरण
चीन दीर्घकाळापर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश राहिला होता. 1949 नंतर कम्युनिस्ट पक्ष चीनमध्ये सत्तेवर आला असता मोठ्या परिवारांचे प्रमाण वाढले. याच्या पुढील तीन दशकांमध्ये देशाची लोकसंख्या दुप्पट झाली. यामुळे देशाच्या लोकसंख्येची भूक भागविण्याचे आव्हान सरकारसमोर उभे राहिले होते. यामुळे चीनने एक मूल धोरण लागू केले होते. याच्या अंतर्गत महिलांना एकापेक्षा अधिक मूलांना जन्म देण्यासाठी अर्ज करावा लागत होता. याचे उल्लंघन केल्यास गर्भपात करविला जायचा आणि दंड ठोठावला जात होता. याचबरोबर मुलाचा ओळख क्रमांक जारी केला जात नव्हता.
100 महिलांमागे 104 पुरुष
चीनच्या अहवालानुसार तेथे लिंग गुणोत्तर विषम आहे. तेथे दर 100 महिलांमागे 104 पुरुष आहेत. तर चीनमध्ये वृद्ध लोकसंख्या वाढत आहे. देशाच्या लोकसंख्येचा एक पंचमांश हिस्सा 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा आहे. या श्रेणीतील एकूण लोकसंख्या 31 कोटी असून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 22 टक्के आहे. 2035 पर्यंत हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याचा अनुमान आहे.
प्रोत्साहन योजनाही प्रभावहीन
घटणाऱ्या लोकसंख्येमुळे चिंतेत असलेल्या चीनच्या सरकारने मे 2021 मध्ये लोकसंख्या वाढविण्यासाठी तीन मूल धोरण स्वीकारले होते. चीनच्या सरकारने अनेक प्रांतांमध्ये जन्मदर वाढविण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्माकरता प्रोत्साहन योजना लागू केल्या आहेत. परंतु या प्रोत्साहन योजनांमुळे फारसा फरक पडलेला नाही. तर चीनमध्ये शहरीकरणाचे प्रमाण 67 टक्के झाले आहे.









