उपग्रह निरीक्षणाच्या आधारे दावा : अमेरिकन अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनची आण्विक पाणबुडी वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये बुडाली आहे. बुडालेली पाणबुडी झाओ गटातील असून ती अणुऊर्जेवर चालणारी होती. ही घटना मे किंवा जून महिन्यात घडली असली तरी त्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. उपग्रह निरीक्षणांमध्ये निदर्शनास आलेल्या दृश्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनीही पाणबुडी बुडाल्याचा दावा केला आहे. मात्र, चीनने अद्याप या प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही. वॉशिंग्टनमधील चिनी दुतावासाच्या प्रवक्त्याने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी पाणबुडीसंबंधी कोणतीही माहिती दिलेली नाही.
चीनची नवी-कोरी आण्विक पाणबुडी समुद्रात बुडाल्यामुळे चीनच्या महत्त्वाकांक्षेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे निळ्या पाण्याच्या नौदलाचे स्वप्न पाहत असताना घडलेल्या या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे. हा अपघात लपवण्याचा चिनी अधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांनी हा अपघात उघडकीस आला. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुऊवातीला वुहानजवळील शिपयार्डमध्ये चिनी आण्विक पाणबुडी बुडाल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
16 मे नंतर पाणबुडी बेपत्ता
10 मार्च रोजी मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या एका उपग्रह प्रतिमेत झाओ-क्लास पाणबुडी वुहानजवळील शिपयार्डमध्ये ठेवल्याची दिसून आली होती. ही पाणबुडी तिच्या लांब आकाराच्या शेपटीमुळे ओळखली जाते. यानंतर 16 मे रोजी प्लॅनेट लॅबच्या सॅटेलाईट इमेजमध्येही ती दिसली. मात्र, जूनच्या उत्तरार्धात पुन्हा छायाचित्रे घेण्यात आल्यानंतर ती निदर्शनास आलेली नाही.
चीनने पाणबुडीबाबत कोणतीही माहिती दिली नाही, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे, मात्र ती पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी काही महिने लागू शकतात, असे मानले जात आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) देखील या घटनेला अद्याप दुजोरा दिलेला नाही. ती कशामुळे बुडाली हे कळू शकले नाही, असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. ती बुडाली तेव्हा त्यात अणुइंधन होते की नाही हेही माहीत नाही. तसेच या अपघातात जीवितहानी झाली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.
चिनी उपकरणांच्या गुणवत्तेवर प्रŽचिन्ह उपस्थित केले जात आहे, असे एका अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. चीनचे संरक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराने बुडाले आहे. या घटनेमुळे पीएलएच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चीन एकीकडे नौदलाचा विस्तार करत असताना पाणबुडी बुडण्याची ही घटना बीजिंगसाठी लाजिरवाणी असल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
गेल्यावषी ऑगस्टमध्येही चीनच्या आण्विक पाणबुडीत 55 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. चिनी पाणबुडी पिवळ्या समुद्रात खडकाला आदळल्यामुळे तिची ऑक्सिजन यंत्रणा निकामी झाली होती. यानंतर गुदमरून जवानांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यावेळीही चिनी अधिकाऱ्यांनी अपघात झाल्याचा इन्कार केला होता.
अपघातावर चीनने मौन
चीन आपल्या नौदलाचा विस्तार करण्यावर भर देत असताना ही घटना घडली आहे. यात अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचाही समावेश आहे. चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने पाणबुडी बुडण्याबाबत निवेदनाच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. सॅटेलाईट इमेजेसवर संशोधन करणारे टॉम शुगार्ट यांनी सर्वप्रथम ही माहिती दिली. आधी आपल्याला वाटले की पाणबुडी बुडाली असेल, पण नंतर कळले की ती चीनची आण्विक शक्तीवर चालणारी पाणबुडी आहे, असे शुगार्ट यांनी म्हटले आहे.
चीनकडे सहा आण्विक पाणबुड्या
चीनच्या लष्करी सामर्थ्यावर गेल्यावषी प्रसिद्ध झालेल्या पेंटागॉनच्या अहवालानुसार, बीजिंगकडे 2022 च्या अखेरीस 48 डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक पाणबुड्या आणि सहा आण्विक पाणबुड्या असण्याची अपेक्षा आहे. अमेरिका हा समुद्रात जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे, परंतु चीन हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीच्या उत्पादनात विविधता आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चिनी आण्विक पाणबुड्या बहुतांशी हुलुडाओ शिपयार्डमध्ये बांधल्या गेल्या आहेत, परंतु अणुशक्तीवर चालणाऱ्या हल्ला पाणबुड्या आता वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये बांधल्या जात आहेत.
अमेरिका आघाडीवर
अमेरिकेकडे 53 जलद हल्ला पाणबुड्या, 14 बॅलेस्टिक मिसाईल पाणबुड्या आणि चार गाइडेड मिसाईल पाणबुड्या आहेत. अमेरिकेचा संपूर्ण पाणबुडीचा ताफा अणुऊर्जेवर चालतो. चीनला आपल्या पाणबुड्यांची संख्या 2025 पर्यंत 65 आणि 2035 पर्यंत 80 करायची आहे. चीनकडे आधीच 370 हून अधिक जहाजांसह जगातील सर्वात मोठे नौदल आहे. चीनने आता अणुइंधन जाळणाऱ्या अटॅक पाणबुडीच्या नवीन पिढीचे उत्पादन सुरू केले आहे. तसेच नवीन आक्रमण पाणबुडी, पृष्ठभागावरील युद्धनौका आणि नौदल विमाने विकसित करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे.