वृत्तसंस्था / डालियान (चीन)
येथे सुरू असलेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या एएफसी आशियाई चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात यजमान चीनने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव करून पूर्ण गुण वसुल केले.
या सामन्यात भारतीय फुटबॉल संघातील एकाही फुटबॉलपटूला शेवटपर्यंत गोल नेंदविता आला नाही. चीन संघातील हु हेताओने नजरचुकीने आपल्या संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडल्याने भारताला हा बोनस गोल मिळाला. दरम्यान तावो क्वियांगलाँग आणि मोहमेती यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्याच्या मध्यतंरापर्यंत गोलफलक कोराच होता. सामन्याच्या उत्तरार्धात चीनकडून 3 गोल नोंदविले गेले. 68 मिनिटाला चीनला पेनल्टीची संधी मिळाली आणि त्यांचा कर्णधार क्वियांगलाँगने खाते उघडले. चीनच्या हेताओने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून भारताला बोनस गोल म्हणून 92 व्या मिनिटाला बहाल केला. 96 व्या मिनिटाला चीनचा दुसरा गोल मोहमेतीने नेंदवित भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी मालदीवने माघार घेतल्याने आता ग गटात भारत, संयुक्त अरब अमिरात आणि यजमान चीन यांचा समावेश आहे. या गटातून आता चीनने या विजयानंतर 4 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. भारताला मात्र आपले खाते उघडता आलेले नाही. मंगळवारी या स्पर्धेतील भारताचा सामना संयुक्त अरब अमिरातबरोबर होणार असून हा सामना भारताला मोठ्या गोलफरकाने जिंकावा लागेल तसेच त्यांना इतर सामन्यातील निकालांची वाट पहावी लागेल. एएफसी आशिया चषक 23 वर्षाखालील वयोगटाची फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षीच्या 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत खेळविली जाणार आहे.









