गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे एक माजी संरक्षण मंत्री भारतात आले होते. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक धक्कादायक विधान केले. युपेनमधील युद्धाचा फायदा घेऊन चीन भारतावर आक्रमण करू शकतो, असा गंभीर दावा त्यांनी केला. जिम माटीस यांच्यामते जर रशिया युपेनच्या युद्धात यशस्वी झाला तर भारताशी लढाई करण्याची चीनला खुमखुमी येईल आणि तो लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल (एलएसी) पार करत भारतावर जबर संकट कोसळवेल असा या अमेरिकन नेत्याचा युक्तिवाद आहे
दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमध्ये चीनने मोठी घुसखोरी करून भारतापुढे मोठे आव्हान उभे केलेले असताना त्याचा मुकाबला कसा करावयाचा याचे भान अजून राज्यकर्त्यांना आलेले दिसत नाही. खरोखर चीन केव्हा कोठे काय करणार हे जगाला एक मोठे कोडे पडलेले आहे. अमेरिकेसह सारे देश हे गूढ उकलण्याच्या मागे लागले आहेत. नुकतेच चीनने आपले संरक्षण बजेट सतत आठव्या वषी वाढवून ते आता 225 बिलियन डॉलर्सचे केलेले आहे. एक बिलियन युएस डॉलर म्हणजे 8,000 कोटी रुपये. म्हणजे 18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त. भारताचे 23-24 चे संरक्षण बजेट हे 5.94 लाख कोटी रुपये आहे हे लक्षात घेतले तर चीनचे बजेट आपल्या तिपटीपेक्षा जास्त आहे.
माटिस यांनी व्यक्त केलेली भीती निराधार नाही. चीन आता पुढे काय करणार? याबाबत सारे जगच साशंक झाले आहे. युपेन युद्धात चीन रशियाला शस्त्रांची मदत करू शकतो या कल्पनेने अमेरिका आणि यूरोप हादरले आहेत. चीनने असे काही कृत्य केले तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागतील अशी ताकीद जर्मनीचे चान्सलर ओलॉफ शोल्झ यांनी दिली आहे. शोल्झ यांनी नुकतीच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी बोलणी केली.
युपेनवरील आक्रमणाची संधी साधून अडचणीत सापडलेल्या रशियाला अतिशय लेचापेचा करण्याचे यूरोप-अमेरिकेचे धोरण आहे. ते बऱयाचअंशी यशस्वी होत असताना चीनने मध्ये ढवळाढवळ करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. युपेन शस्त्रसंधीची बोलणी करत नाही आणि यूरोप-अमेरिका त्याला शस्त्र आणि अस्त्र पुरवत आहेत अशा दुहेरी पेचात रशियन नेते व्लादिमिर पुतीन सापडले आहेत.
रशियाला मागे टाकून चीन कधीच महासत्ता झालेला आहे. आता शी जीन पिंग यांना अमेरिकेला मागे टाकावयाचे आहे. याकरताच दक्षिण चीन महासागरात त्याची दादागिरी वाढली आहे. तैवानला काहीही करून आपल्या कब्जात त्याला घ्यायचे आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळय़ा प्रकारे आगळीक काढून तैवानवरील दादागिरी त्याने वाढवली आहे. रशियाने जर युपेन पचवला तर आपण तैवान गिळंकृत करू असे आडाखे तो बांधत आहे. युपेन युद्धात रशियाची दमछाक होत आहे तर त्यामुळेच चीनची ताकद वाढत आहे.
पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्याने कधीनव्हे एवढा मॉस्को बीजिंगवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियामधील एका प्रमुख वर्तमानपत्राने ‘दि एज’ ने नुकतीच मुख्य पानावर एक ठळक बातमी दिली. चीनच्या आक्रमणाला सिद्ध होण्यासाठी युद्धस्तरावर देशाने तयारी केली पाहिजे. चीनने तैवानच्या प्रश्नावरून अमेरिका आणि त्यांच्या साथीदार देशांसमोर युद्धाचे मोठे आव्हान उभे केले आहे. शी यांच्या आगलाव्या धोरणामुळे 2026 पर्यंत तैवानवर कधीही हल्ला होऊ शकतो आणि ऑस्ट्रेलियासह लगतचे देश त्यात आपसूक ओढले जाणार आहेत. एवढे मोठे गंभीर संकट समोर असूनदेखील त्याला सामोरे जाण्यासाठी देशाची अजिबात तयारी झालेली नाही असे एका तज्ञ समितीचा हवाला देऊन त्या वर्तमानपत्राने लोकांना सावध करायचा प्रयत्न केलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एक खंडप्राय देश आहे. तेथील लोकसंख्या फार नाही आणि चीनपासून तो 4,000 किमी दूर असला तरी तिथे आक्रमणाची भीती बाळगली जात आहे यातून चीनचा युद्धज्वरच दिसतो.
चीन युद्धखोर होत आहे असे दिसत असताना दुसऱया महायुद्धापासून लष्करी बाबतीत नेमस्त राहिलेला जपान खाडकन सावध झालेला आहे. नजीकच्या भविष्यकाळात तो आपले संरक्षण बजेट दुपटीने वाढवणार असून चिनच्या वाढत्या धोक्मयाला कसे तोंड द्यायचे यावर युद्धपातळीवर विचारविनिमय त्याने सुरु केला आहे. अमेरिकेकडून शेकडो क्षेपणास्त्रे मागवली जात आहेत अशीदेखील वृत्ते आहेत. इटली आणि ब्रिटनबरोबर तो एक लांब पल्ल्याचे अद्ययावत फायटर जेट तयार करत आहे. कालपरवापर्यंत चीनचा साथीदार समजला जाणारा फिलिपिन्स देखील आता बीजिंग विरोधी होऊ लागला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या वाढत्या आक्रमक हालचालीने सावध होऊन त्याने परत अमेरिकेशी जवळीक सुरु केली आहे. फिलिपिन्सचे उत्तरेकडील शेवटचे बेट हे तैवानच्या 100 किलोमीटरवर असल्याने चीनने चालवलेल्या हालचालींनी तो चिंतीत झाला आहे.
चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तो आपल्या बेटांवर चार तळ अमेरिकेला लवकरच देणार आहे. हिंदी-चिनी भाई-भाई करताकरता बीजिंगने देशाचा कसा विश्वासघात केला ते सहा दशकांपूर्वी दिसून आले. चिनी आक्रमणाने पंडित नेहरूंच्या स्वप्नाचा कसा चुराडा झाला ते देशाने पाहिले. स्वतंत्र भारताला तो इतका मोठा धक्का होता की त्याच्यातून तो अजूनदेखील पूर्णपणे सावरलेला नाही. मित्र म्हणून घेऊन कोणी घात केला की त्याचे व्रण मनावर कायमचे राहतात तसेच काहीसे झाले आहे. जनता पक्षाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना चीनशी संबंध सुधारण्याच्या झालेल्या प्रयत्नांचे इंदिरा गांधींनी स्वागतच केलेले होते.
अशावेळी चीनच्या संभाव्य धोक्मयाचा मुकाबला करण्याकरता भारत काय करणार याविषयी सर्वदूर प्रश्न विचारले जात आहेत. गेल्या दोन वर्षात विरोधी पक्षांनी बऱयाच वेळेला संसदेत मागणी करूनदेखील चीन आणि त्याच्या वाढत्या घुसखोरीवर चर्चा झालेली नाही. चीनने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये केलेली घुसखोरी म्हणजे युपेनवरील आक्रमणासारखेच आहे असा राहुल गांधींचा दावा आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना ते मान्य नाही. याउलट जयशंकर यांनी चीन फार मोठी आर्थिक महासत्ता असताना भारत करू तरी काय शकतो अशा स्वरूपाचे केलेले विधान भ्याडपणाचे आहे असे राहुल यांनी ठणकावले आहे. अमेरिकेने आपल्याला विळखा घातलेला आहे अशी चीनची भावना झाल्याचे वृत्त आहे. असंतुष्ट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जर चीनने आपला गिळंकृत केलेला भूभाग सोडला नाही तर भारताने अमेरिकेची साथ द्यावी असे ठामपणे सांगितले आहे. आपल्या हद्दीत ‘कोई आया नही, कोई गया नहीं’ असे म्हणून काही होणार नाही.
चीनबरोबरचे भारताचे संबंध सध्या ‘अस्वाभाविक, विचित्र’ (abnormal) आहेत अशी स्पष्टोक्ती करून नवी दिल्लीने ‘सारे काही आलबेल नाही’ असा सूर मात्र लावला आहे. चिनी ड्रगन त्याला किती भीक घालणार? ‘लातों के भूत बातोंसे नहीं मानते’, अशी एक हिंदी म्हण आहे. तिचा अर्थ असा की दुष्ट माणसाला केवळ दंडाचीच भाषा समजते. तात्पर्य काय तर सीमेवर भारताकरता कसोटीचा काळ आलेला आहे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असाच सरळ हिशोब दिसत आहे. हिमालयापलीकडील ड्रगन परत एकदा चवताळला आहे. त्याला वठणीवर कसे आणायचे हा यक्षप्रश्न आहे. गप्प बसून भागणार नाही.
सुनील गाताडे








