वृत्तसंस्था/ चेन्नई
येथील मेयर राधाकृष्णान स्टेडियमवर सुरू असलेल्या 2023 च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने चीनचा 6-1 अशा गोलफरकाने दणणीत पराभव करत पाचवे स्थान मिळविले.
या स्पर्धेत पाकतर्फे मोहमद खान आणि मोहमद अमाद यांनी प्रत्येकी दोन तर अब्दुल शाहीद आणि अब्दुल राणा यांनी प्रत्येकी एक गोल केला. चीनतर्फे एकमेव गोल चेनने नोंदवला. या सामन्यात पाक संघाने बऱ्याच नव्या खेळाडूंना संधी दिली होती. कारण पाकच्या या वरिष्ठ संघातील खेळाडू सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या हेंग झोयु येथील आशियाई स्पर्धेसाठी तयारी करीत आहेत.
शुक्रवारच्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीतच पाकिस्तानने वेगवान आणि आक्रमक चढाया करत आपला विजय निश्चि केले होता. नवव्या मिनिटला पाकचे खाते मोहमद अमादने उघडले. दहाव्या मिनिटाला पाकला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि मोहमद खानने पाकचा दुसरा गोल केला. 11 व्या मिनिटाला पाकचा तिसरा गोल मोहमद खानने पुन्हा पेनल्टी कॉर्नरवरच नोंदवला. 15 व्या मिनिटाला अब्दुल शाहीदने पाकचा चौथा गोल केला. पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात पाकने 4 गोल नोंदवले होते. मध्यंतरापर्यंत पाकने चीनवर 4-0 अशी आघाडी मिळवली होती. 35 व्या मिनिटाला चेनने चीनचे खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडून पाकची आघाडी थोडी कमी केली. 52 व्या मिनिटाला पाकचा पाचवा गोल मोहमद अमादने केला. 58 व्या मिनिटाला अब्दुल राणाने पाकचा सहावा आणि शेवटचा गोल करून चीनचे आव्हान संपुष्टात आणले.









