विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा : भाजपने कडक शब्दात फटकारले : 4,000 चौरस किलोमीटर भारतीय भूभाग ताब्यात घेतल्याचा दावा,चीनने व्यापलेली जमीन भारताने परत घ्यावी अशी जोरदार मागणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत पुन्हा एकदा चीनने व्यापलेल्या जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. चीनने व्यापलेली जमीन भारताने परत घ्यावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. चीनने 4,000 चौरस किलोमीटर भारतीय भूभाग ताब्यात घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. तसेच अमेरिकेने लादलेले परस्पर शुल्क किंवा आयात शुल्क भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल, असे सांगून त्यांनी या मुद्यांवर सरकारकडून उत्तरे मागितले. त्यावर लोकसभेत शून्य प्रहरात गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले. भाजपच्या राजवटीत चीनला एक इंचही जमीन देण्यात आली नव्हती. काँग्रेसच्या राजवटीत चीनने भारतीय भूभागावर कब्जा केला होता, असा प्रतिहल्ला करत भाजपने राहुल गांधी यांना फटकारले.
राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत चीनसोबतच्या भारतीय सीमेचा मुद्दा उपस्थित केला. शून्य प्रहरात बोलताना भारत आणि चीनच्या राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांवर सरकारवर टीका केली. चीन आपल्या 4,000 चौरस किलोमीटर भूभागावर घुसलेला आहे. चीनने ताब्यात घेतलेल्या या भूभागाचे नेमके काय होत आहे? अशी विचारणा त्यांनी केली. याप्रसंगी त्यांनी गलवान घटनेचा संदर्भ देत 2020 मध्ये 20 जवान हुतात्मा झाल्याचाही उल्लेख केला. तसेच चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला असतानाही काही काळापूर्वी आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री चिनी राजदूतासोबत केक कापत होते हे पाहून मला धक्का बसल्याचेही ते म्हणाले.
अमेरिकन कराचा मुद्दाही उपस्थित
परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय बाबी पाहते. पण आमचे भागीदार देश आमच्यावर 26-27 टक्के कर लादत असताना आपण फक्त पाहत आहोत. आपला संपूर्ण उद्योग कोसळला आहे. वाहन उद्योग, दूरसंचार सर्वकाही डबघाईला आले आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधींबद्दलचा एक किस्साही सांगितला. एकदा कोणीतरी इंदिरा गांधींना परराष्ट्र व्यवहारांबाबत विचारणा केली होती. त्यांना उजवीकडे जायचे आहे की डावीकडे? असा प्रश्न केल्यावर ‘मी डावीकडे किंवा उजवीकडे जाणार नाही, उलट मी सरळ आणि ताठ उभी राहीन, मी भारतीय आहे आणि सरळ उभी राहीन’ असे उत्तर इंदिरा गांधी यांनी दिल्याची आठवण राहुल गांधी यांनी करून दिली.
अनुराग ठाकूर यांचे रोखठोक प्रत्युत्तर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय भूभागावर कथित चिनी अतिक्रमणाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र हल्ला चढवला. ‘भारत आणि चीनबद्दल बोलणाऱ्यांनी चिनी लोकांसोबत सूप प्यायले आहे’ याची आठवण अनुराग ठाकूर यांनी करून दिली. तसेच भारताची एक इंचही जमीन चीनच्या हाती गेलेली नाही, असे त्यांनी ठामपणे सभागृहात सांगितले.









