कॅनडामधील निवडणुकीसंबंधी चौकशी सुरू : ‘जादुई अस्त्रा’वरून गदारोळ
वृत्तसंस्था / टोरंटो
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीतील चीनच्या भूमिकेवरून गदारोळ सुरू झाला आहे. चीनने कॅनडाचे वादग्रस्त पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना निवडणुकीत विजय मिळविण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर आता कॅनडाच्या निवडणूक देखरेख संस्थेने चिनी हस्तक्षेपाच्या आरोपाची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे. कॅनडात अलिकडेच संघीय निवडणूक पार पडली होती.
याचदरम्यान कॅनडाच्या निवडणुकीत चीनचा दूतावास तसेच महावाणिज्य दूतावासाच्या हस्तक्षेपाचा आरोप चीनने फेटाळला आहे. हा आरोप पूर्णपणे खोटा असून मूर्खतापूर्ण असल्याचा दावा चीनच्या विदेश मंत्रालयाने केला आहे.
या आरोपाला चीनचा तीव्र विरोध आहे. कॅनडामधील दूतावास सुरळीतपणे कार्यरत रहावीत याकरता तेथील यंत्रणेने व्यवहार्य पावले उचलावीत. तसेच दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये हस्तक्षेपाच्या अफवा रोखण्यासाठी देखील पावले उचलली जावीत असे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते किगन गांग यांनी म्हटले आहे. चीनच्या या स्पष्टीकरणादरम्यान कॅनडामध्ये निष्पक्ष चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. चीनचा हस्तक्षेप सिद्ध झाल्यास त्याच्या विरोधात गुन्हेगारी खटला चालविला जाऊ शकतो. जस्टिन ट्रुडो हे स्वतःच्या धोरणांवरून वारंवार वादात राहिले आहेत. शेतकऱयांचा मुद्दा असो किंवा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा विषय ट्रुडो हे स्वतःच्या भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात.
चीनविरोधी उमेदवार लक्ष्य
कॅनडाच्या पंतप्रधानांनी यापूर्वी चीनच्या अध्यक्षांसोबतचे संभाषण उघड केले होते, या घटनेनंतर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे भडकले होते. कॅनडामधील विरोधी पक्ष आणि त्याच्या एका वरिष्ठ नेत्याने 2019 तसेच 2021 मधील संघीय निवडणुकीत चीनच्या कथित हस्तक्षेपाच्या चौकशीच्या मागणीचे काही दिवसांपूर्वीच समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीत चिनी हस्तक्षेप करणाऱया नेटवर्कने पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीच्या बाजूने अभियान चालविले होते, तसेच चीनबद्दल कठोर भूमिका घेणाऱया उमेदवारांच्या विरोधात पावले उचलली होती असे कॅनडाच्या गुप्तचर सूत्राचा दाखला देत एका प्रसारमाध्यमाने म्हटले होते.
सरकारकडून हस्तक्षेपाची कबुली
कुठल्याही हस्तक्षेपाचा ठोस पुरावा आहे की नाही हे शोधण्यासाठी ही समीक्षा होत असल्याचे कॅनडाच्या निवडणूक आयुक्त कॅरोलिन सिमार्ड यांनी संसदीय समितीसमोर म्हटले आहे. चीनने कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचा प्रयत्न केला होता असे संघीय सरकारकडून प्रकाशित अहवालातही मान्य करण्यात आले आहे. परंतु चीन हस्तक्षेपाच्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्याचा निष्कर्ष सरकारने काढला होता.
चीनच्या अध्यक्षांचे जादुई अस्त्र
चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाच्या युनायटेड प्रंट वर्क डिपार्टमेंटकडे चीनच्या विदेश मंत्रालयाहून अधिक बजेट असल्याचे कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख डेव्हिड विगनेअल्ट यांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते. चीनच्या याच विभागावर विदेशातील निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. चीनचे अध्यक्ष युनायटेड प्रंट वर्क डिपार्टमेंटला याचमुळे जादुई अस्त्र संबोधित असल्याचा दावा विगनेअल्ट यांनी केला होता.









