रशिया-चीन-उत्तर कोरिया एकत्र येण्यासंबंधी वाद
वृत्तसंस्था/बीजींग
चीन, रशिया आणि उत्तर कोरिया हे तीन देश एकत्र येऊन अमेरिकेविरोधात कारस्थान करीत आहेत, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. या तीन देशांचे नेते चीनच्या ‘विजय दिन’ संचलनात एकत्र आले होते. या संचलनात चीनने आपल्या शस्त्रसामर्थ्याचे प्रदर्शन केले होते. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याने अमेरिकेची चिंता वाढली असून त्यामुळे ट्रंप यांनी चीनवर टीका केली. चीनने गुरुवारी ट्रंप यांनी केलेला आरोप फेटाळला आहे. कोणत्या तरी तिसऱ्या देशाला लक्ष्य करण्यासाठी चीन कधीही दुसऱ्या देशांसमवेत एकत्र येत नाही, असे प्रत्युत्तर चीनने अमेरिकेला दिले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये यासंबंधी लेख प्रसिद्ध झाला असून त्यात हे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. चीनच्या समारंभात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे एकत्र आले होते. त्यांच्यासमवेत अन्य 26 देशांच्या नेत्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
ट्रंप काय म्हणाले होते ?
रशिया, अमेरिका आणि उत्तर कोरिया हे देश आणि त्यांचे नेते अमेरिकेविरोधात कारस्थान करण्यासाठी एकत्र आले आहेत. ही बाब अशोभनीय आहे. चीनला विदेशी हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी अमेरिकेने एकेकाळी युद्ध केले होते. त्या युद्धात अमेरिकेच्या अनेक सैनिकांनी आपले प्राण गमावले होते, ही बाब चीनने विसरु नये, असे आवाहनही ट्रंप यांच्याकडून करण्यात आले होते. चीनच्या विजय दिनी चीन नेहमीच विदेशी नेत्यांना आमंत्रित करीत असतो. समविचारी देशांसमवेत विजय दिनाचा आनंद व्यक्त करण्याची चीनची परंपरा आहे. ती लक्षात घेऊन रशिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. अमेरिकेच्या विरोधात आम्ही इतर देशांना एकत्र करीत नाही, असेही ‘ग्लोबल टाईम्स’ या चीनी सरकारी वृत्तपत्रात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे.









