चीन हा देश नेमक्मया कोणत्या वेळेस काय करेल, हे सांगता येणे कठीण आहे. चीनकडे मोठी हानी घडविणारी रासायनिक अस्त्रs आहेत. चीन हा कोरोना विषाणूचा निर्माता देश आहे. चीनने सायबर तंत्रज्ञान आणि हॅकिंगमध्ये मोठी मजल मारली आहे व त्याचा उपयोग हा देश इतर देशातील तंत्रज्ञान, माहिती चोरण्यासाठी आणि हेरगिरीसाठी करतो, असे अनेक आरोप चीनवर गेल्या काही वर्षांपासून होत आले आहेत आणि चीन सातत्याने ते नाकारत आला आहे.
या आरोपांच्या यादीत गेल्याच आठवडय़ात आणखी एक खळबळजनक आरोपाची भर पडली आहे. हा आरोप म्हणजे चीन आकाशस्थ बलूनद्वारे हेरगिरी करीत आहे. अमेरिकेतील मोंटाना भागात हा चिनी बलून दिसून आला, जो अमेरिकन लढाऊ विमानांनी पाडला. ही कहाणी इथेच संपत नाही तर ट्रम्प पंतप्रधान असताना चीनने अशाच प्रकारचे बलून्स अमेरिकन आकाशात पाठवले होते, असे अमेरिकन अधिकाऱयांनी पेंटॅगॉनचा निर्वाळा देत स्पष्ट केले आहे. अशाच प्रकारचे बलून्स 2020 साली जपानमध्ये तर 2021 साली भारताच्या अंदमान बेटांवर दिसून आल्याची माहितीही पुढे आली आहे. तत्कालिन ट्रम्प सरकार, जपान किंवा भारताने त्यावेळी या बलून्सची गांभीर्याने दखल घेतली नाही. हेरगिरीसाठी अत्याधुनिक उपग्रह, ड्रोन्स आणि इतर तंत्रज्ञान विकसित झाले असता बलूनचा वापर कोण करेल? असा स्वाभाविक निष्कर्ष त्यांनी काढला असावा. तथापि, जपान आणि भारत ही चीनच्या सीमेजवळील राष्ट्रे आहेत. त्यामुळे हवेच्या गतीमुळे, दिशेमुळे चिनी बलून्स या देशातील आकाशात दिसू शकतात. परंतु, कुठच्या कुठे दूरस्थ ठिकाणी असलेल्या अमेरिकेवर चिनी बलून दिसणे हे निश्चितच निर्हेतूक नव्हे तर पूर्वनियोजित कृत्य आहे, असा संशय बळावण्यास वाव मिळाला आहे. दुसरे असे की जपान, भारत, अमेरिका ही तीन राष्ट्रे चीनशी अटीतटीची स्पर्धा करणारी स्पर्धक राष्ट्रे आहेत. या आर्थिक आणि संरक्षणविषयक क्षेत्रात स्पर्धा करणाऱया राष्ट्रांशी चीनचे संबंध दोस्तीऐवजी दुःस्वासावर आधारित आहेत. त्यामुळे या नेमक्मया व निवडक राष्ट्रांच्या आकाशात चिनी बलून्सचे भ्रमण निश्चितपणे चीनच्या हेतूबाबत शंका बळकट करणारे ठरते.
अशावेळी चीनच्या हेरगिरीचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटले आहेत. देश पातळीवर हे चिनी बलून आधीच का पाडले गेले नाहीत? अशी विचारणा होत आहे. दुसरीकडे चीनचे अमेरिकेशी संबंध किमान शांततेच्या पातळीवर आणण्यासाठी व परस्परातील संवेदनशील मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी 6 फेब्रुवारी रोजी चीनच्या दौऱयावर जाऊ इच्छिणाऱया अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी हा दौरा रद्द करण्याचे ठरवले आहे. गतवषीच्या नोव्हेंबर महिन्यात जी-20 राष्ट्रांच्या बाली येथील परिषदेत बायडेन आणि जिनपिंग यांची भेट झाली होती आणि या भेटीनंतर चीन-अमेरिका संबंधातील तणाव वाढला होता. तो हलका करण्यासाठी अमेरिकन परराष्ट्रमंत्री सदर बैठकीत प्रयत्न करणार होते. परंतु, तितक्मयातच हेरगिरी बलून सोडून चीनने या प्रयत्नातील हवाच काढून टाकली आहे. मंगळवारी प्रतिनिधी सभागृहात बोलताना अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ‘अमेरिकेचे आणि पर्यायाने जगाचे हित साधण्यासाठी आम्ही चीनशी हरप्रकारे सहकार्य करू. मात्र, चीनने जर आमचे सार्वभौमत्व धोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडण्याची आमची परंपरा त्याच पद्धतीने कार्यरत राहील’, असा सज्जड दम हेरगिरी बलूनच्या अनुषंगाने भरला आहे.
या साऱया पार्श्वभूमीवर चीनने नेहमीप्रमाणे जरी साऱया आक्षेप व आरोपांचा इन्कार केला असला तरी अमेरिकेसह जपान, भारत आणि इतर देश चीनच्या बलूनी कारवायांबाबत यापुढे आवश्यक ती सतर्कता बाळगतील, हे निश्चित आहे. चीनच्या अभिनव वाटणाऱया बलून हेरगिरीचा सर्वंकष इतिहास जर तपासला तर अगदी नेपोलियनच्या काळापासून बलूनचा हेरगिरीसाठी वापर होत असल्याचे स्पष्ट होते. 1794 साली नेपोलियनच्या काही सैनिकांनी ते शत्रू पक्षाच्या हालचालींची टेहळणी करण्यासाठी वापरले होते. 19 च्या शतकात अमेरिकन यादवी युद्धात अशाच कारणांसाठी बलून्सचा वापर झाला.
युनियन बलून कॉर्प्स नावाची एक तुकडीच या कामासाठी तैनात करण्यात आली होती. 1954 साली जेव्हा अमेरिका-रशिया शीतयुद्ध आकारास येत होते त्यावेळी छायाचित्रण यंत्रणा बसवलेले बलून्स अमेरिकेकडून सोव्हिएत रशियावर सोडण्यात येत होते. या बलूनसंबंधीचे मुख्य कार्यालय ओहिओ येथील अमेरिकन हवाई दलाच्या मार्गदर्शनात कार्यरत होते. तर सोव्हिएत रशियावर बलून्स, अमेरिकेद्वारे तुर्कस्थानमधून सोडण्यात येत होते.
तंत्रज्ञान जसे विकसित झाले, तशी टेहळणी करणारी खास विमाने, हेरगिरी उपग्रह इत्यादी नवे घटक वापरात येऊ लागले. उदाहरणार्थ, हेरगिरी करणारे उपग्रह आज सहजगत्या छायाचित्रे घेऊ शकतात. संपूर्ण प्रदेशाचे सुस्पष्ट व्हिडिओ चित्रण करू शकतात. रात्रीच्या हालचाली टिपण्याचे तंत्रही अशा उपग्रहात अस्तित्वात असते. दूर आकाशातून पृथ्वीवरील सूक्ष्म घटक व घटनांचे अवलोकन करण्याची क्षमता या उपग्रहात असते. त्यामुळे हेरगिरीसाठी उपग्रह हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सध्या प्रचलित आहे व त्याचा जगभर सर्रास वापर होतो. अशा परिस्थितीत चीनने बलूनचा वापर का केला असावा तर त्याची काही कारणे संभवतात. उपग्रहाच्या तुलनेत बलूनची किंमत अत्यंत स्वस्त असते. तो आकाशात सोडण्यासाठी रॉकेटसारख्या संलग्न प्रणालीची गरज नसते. बलून जो जाणीवपूर्वक टेहळणीसाठी तयार केला जातो, हेरगिरीसाठी बनवला जातो तो जमिनीपासून 1 लाख फूट इतक्मया अंतरावर अवकाशात वावरण्याची क्षमता बाळगून असतो.
स्वाभाविकपणे विमानाने गाठलेल्या उंचीपेक्षा कितीतरी अधिक उंचीवर त्याचे भ्रमण शक्मय असते. इतकेच नव्हे तर इतक्मया उंचीवरील बलूनला खाली पाडवणे देखील इच्छुक राष्ट्रांना दुरापास्त बनते. काही अमेरिकन अधिकाऱयांच्या निर्वाळय़ाप्रमाणे चिनी बलून 60 हजार फूट उंचीवर भ्रमण करीत होता. जी उंची व्यावसायिक विमानांच्या भ्रमण क्षेत्रापेक्षा कितीतरी अधिक होती. लक्ष्यावर केंद्रित स्थिर कक्षेत राहणे, लक्ष्याचे अत्यंत बारकाईने बराच वेळ निरीक्षण करून माहिती मिळविणे आणि पृथ्वीवरील विशिष्ट केंद्रावर ती निःसंदिग्धपणे पाठविणे या डावपेचांसाठी बलूनची उपयुक्तता उपग्रहापेक्षा अधिक सरस आहे. यासाठीच धूर्त चीन आपल्या नेहमीच्या धाटणीनुसार या तंत्राचा वापर करीत आहे. अर्थात, हे तंत्र निष्प्रभ करण्याचे आडाखे चीनचे उपद्रवमूल्य जोखणाऱया देशांकडून एव्हाना बांधले जात असतीलच.
– अनिल आजगावकर








