प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी लढाऊ विमानांच्या घिरटय़ा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनेकदा बजावण्यात आल्यावरही चीन भारताला चिथावणी देत आहे. कोअर कमांडर स्तरीय चर्चा झाल्यावरही चिनी लढाऊा विमाने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळून उड्डाणे करत आहेत. मागील 3-4 आठवडय़ांमध्ये हा प्रकार अनेकदा घडला आहे. चिनी विमानांच्या या कृत्याकडे भारतीय संरक्षण प्रणालीची हेरगिरी म्हणून पाहिले जात आहे. तर भारतीय वायुदल स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे.
जे-11 या प्रकारातील चिनी लढाऊ विमान सातत्याने भारतीय सैन्याच्या ठिकाणाच्या जवळून उड्डाणे करत आहे. चिनी विमानाने अनेकदा 10 किलोमीटरच्या निर्धारित सीमारेषेलाही ओलांडले आहे. या सीमारेषेला कॉन्फिडेन्स बिल्डिंग मेजर म्हटले जाते. तर चीनची ही आगळीक पाहता भारतीय सैन्यानेही ठोस पावले उचलली आहेत. भारताने मिग-29 आणि मिराज 2000 यासारख्या लढाऊ विमानांनी सीमेनजीक तैनात केले आहे. चीनकडून आगळीक झाल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतीय सैन्याने केली आहे.
चिनी विमानांच्या या कृत्यामागे त्याची भीती असल्याचा अनुमान व्यक्त होतोय. भारतीय वायुदलाने लडाख क्षेत्रात स्वतःच्या तळाचे अद्ययावतीकरण केले आहे. या आधुनिक सुविधांद्वारे चीनच्या हालचालींवर नजर ठेवता येऊ शकते. भारतीय वायुदल अत्यंत प्रभावीपणे चीनला प्रत्युत्तर देत आहे. तर चिनी लढाऊ विमानांच्या उड्डाण पॅटर्नवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. चीनचे विमान किती उंचीपर्यंत कितीवेळ उड्डाण करू शकते हे देखील पाहिले जात आहे.
चिनी विमानांची ही चिथावणीपूर्ण कारवाई 24-25 जूनपासून सुरू झाली आहे. तेव्हा एका चिनी विमानाने पूर्व लडाखमध्ये भारतीय सीमेच्या अत्यंत जवळून उड्डाण केले होते. त्यानंतर अनेकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक चुमार सेक्टरमध्ये अशाचप्रकारे सीमा रेषेचे उल्लंघन करण्यात आले. तर भारतीय वायुदलाने देखील या क्षेत्रातील विमानोड्डाणे वाढविली आहेत. चीनकडून एप्रिल-मे 2020 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जैसे थे स्थिती बदलण्याच्या प्रयत्नापासून भारत सतर्क झाला आहे. तेव्हापासून भारत लडाख क्षेत्रातील स्वतःच्या सैन्यसुविधांचा विकास करण्यासाठी पावले उचलत आहे.









