वृत्तसंस्था / गुवाहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या शनिवारी येथे झालेल्या विश्व कनिष्ठांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचे अजिंक्यपद चीनने पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या अंतिम लढतीत चीनने इंडोनेशियाचा 45-30, 45-44 असा पराभव केला.
या स्पर्धेत यजमान भारत आणि जपान यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदके मिळाली. चीन आणि इंडोनेशिया यांच्यातील झालेल्या अंतिम लढतीत चीनच्या स्पर्धकांनी पूर्वाधार्तातील पहिल्या सेटमध्ये पाचही सामने जिंकले. मात्र दुसऱ्या सेटमध्ये इंडोनेशियाकडून थोडा प्रतिकार झाला. मुलींच्या दुहेरीतील लढतीत इंडोनेशियाच्या इस्तोरा सेनायन, रिस्का अंग्रेनी आणि रंजनी नेस्टीनी यांनी चीनच्या हेन आणि सियान यांचा 9-5 असा पराभव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या सामन्यात इफ्सेन प्रमुदया आणि नेस्टीनी यांनी चीनच्या स्पर्धकांचा पराभव करत आपल्या संघाला 13-7 अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर चीनच्या चेन किंग आणि केओ यांनी पुढील 12 पैकी 11 गुण पटकावित इंडोनेशियाचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या लियु आणि यु या जोडीने दोन एकेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या वायरीवान आणि उबेदिल यांना 9-9 असे बरोबरीत रोखल्याने चीनने ही लढत 45-44 अशा फरकाने जिंकली.









