विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी करून दिली आठवण : भारतावर करायचे टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बीटी माइंडरश कार्यक्रमात जागतिक राजकारण आणि भारत-चीनच्या प्रतिमेवरुन महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ज्या जगात आम्ही झोपतो, दुसऱ्या दिवशी सकाळी तेच जग तसेच राहिलेले नसते. पाश्चिमात्य देशांनी दीर्घकाळापर्यंत चीनला एक रणनीतिक प्राथमिकता मानले आणि त्याच्या कामगिरीचे कौतुक करत भारताला मागे लोटण्याचा प्रयत्न केला. चीनला मजबूत करणे, त्याची कामगिरी आणि इतिहासाची प्रशंसा करणे आणि भारतावर टीका करणे पाश्चिमात्यांसाठी एक रणनीतिक हतबलता राहिली असल्याचे मत जयशंकर यांनी मांडले आहे.
नॅरेटिव्हनेच शक्ती निश्चित होत असलेल्या जगात भारताला स्वत:ची मजबूत उपस्थिती नोंदविण्यासाठी आणखी अधिक मेहनत करावी लागणार आहे. चीन दीर्घकाळापर्यंत पाश्चिमात्य देशांची एक रणनीतिक प्राथमिकता राहिला. चीनला एक समाजाच्या स्वरुपात मजबूत करणे, त्याची कामगिरी आणि इतिहासाची प्रशंसा करणे आणि भारताला कमी लेखणे पाश्चिमात्यांची एक रणनीतिक हतबलता होती असे म्हणत जयशंकर यांनी जागतिक व्यासपीठावर भारत आणि चीनच्या प्रतिमेतील अंतराला ऐतिहासिक दृष्टीकोनातून मांडले आहे.
मागील 200 वर्षे जबाबदार
मागील काही वर्षांमध्ये जे काही घडत आहे, ते खरं तर मागील 200 वर्षांच्या घटनांचा परिणाम आहे. ब्रिटिश राजवटीच्या दरम्यान भारतीय इतिहासाला जाणूनबुजून कमकुवत करण्यात आले. तर रणनीतिक कारणांमुळे चीनच्या इतिहासाला चालना देत त्याचे समर्थन करण्यात आल्याची टिप्पणी जयशंकर यांनी केली आहे.
अमेरिका, ब्रिटन चीनचे सर्वात मोठे समर्थक
19 व्या शतकात पाश्चिमात्य देशांना रशिया चीनवर कब्जा करू शकतो अशी भीती होती. जर 19 व्या शतकाचा अभ्यास केला तर त्या काळात चीनचे सर्वात मोठे समर्थक अमेरिका आणि ब्रिटन होते, खासकरून अमेरिकन मिशनरी असे दिसून येईल. चीनला प्रोत्साहन देण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून सांस्कृतिक प्रयत्न करण्यात आले होते असे म्हणत जयशंकर यांनी नोबेल पुरस्कार विजेत्या लेखिका पर्ल एस. बक यांचा उल्लेख केला.
अधिक मेहनत करावी लागणार
भारताला ज्या प्रतिमा प्रतिस्पर्धेला सामोरे जावे लागतआहे, त्याची सुरुवात एका अत्यंत वेगळ्या स्थानावरून होते. आमच्यासमोर एक कठिण आव्हान आहे आणि याचमुळे आम्हाला आणखी मेहनत करावी लागणार आहे. सध्याच्या जगात आम्ही एका निश्चित धारणेसोबत झोपतो, परंतु सकाळ होताच ही धारणा बदललेली असते असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
मुक्त व्यापार करार महत्त्वपूर्ण
भारतासाठी मुक्त व्यापार करार नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहेत आणि आता तर हे आणखी आवश्यक ठरले आहेत. सध्या भारत तीन महत्त्वपूर्ण करारांवर काम करत आहे. युरोपीय महासंघ, ब्रिटन आणि अमेरिकेसाब्sात हे करार करण्याची तयारी सुरू आहे. आणखी काही करार प्रगतिपथावर आहेत. सध्यायच अनिश्चित जगात या प्रयत्नांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आम्हाला लाभ अन् नुकसानीकडेही लक्षपूर्वक पहावे लागणार आहे. तसेच काही न केल्याने कोणते नुकसान होईल हे पहावे लागेल. काही करारांमुळे काही लाभही होऊ शकतात, खासकरून संवेदनशील तंत्रज्ञानांप्रकरणी. भारत नेहमीच ‘इंडिया फर्स्ट’ हे धोरण अवलंबिणार आहे. आमचे लक्ष्य विकसित भारत असल्याचे जयशंकर म्हणाले.









