स्टील्थ लढाऊ विमान देणार
बीजिंग :
भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठा दणका सहन केलेल्या पाकिस्तानकरता आता चीन मोठे पाऊल उचलणार आहे. चीन पाकिस्तानला जे-35 स्टील्थ लढाऊ विमाने पुरविण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानला चीनकडून 40 जे-35 पाचव्या पिढीची लढाऊ विमाने मिळणार असून याचा पहिला संच चालू वर्षात प्राप्त होऊ शकतो. या विमानांमुळे पाकिस्तानी वायुदल भारतीय वायुदलापेक्षा वरचढ ठरणार असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय.
भारत पुढील 12-14 वर्षांपर्यंत पाचव्या पिढीची लढाऊ विमाने तैनात करण्याची शक्यता नसल्याने पाकिस्तानला क्षेत्रात रणनीतिक आघाडी मिळणार असल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. जे-35ए चीनचे पाचव्या पिढीचे स्टील्थ लढाऊ विमान असून ते शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने विकसित केले आहे. चीनकडे पाचव्या पिढीचे आणखी एक लढाऊ विमान जे-20 माइटी ड्रॅगन आहे, परंतु ते केवळ पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी आहे. तर जे-35ए विदेशात निर्यात करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
स्टील्थ लढाऊ विमान लवकरच पाकिस्तानच्या वायुदलाच्या ताफ्यात सामील असेल असे तेथील वायुदलाचे प्रमुख जहीर अहमद बाबर सिद्धू यांनी म्हटले आहे. हे लढाऊ विमान दोन वर्षांमध्ये पाकिस्तानला उपलब्ध केले जाणार होते, परंतु भारतासोबतचा तणाव पाहता चीन हे लढाऊ विमान पाकिस्तानला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
पाककडून चिनी जेटचा वापर
चालू महिन्यात भारतासोबत झालेल्या संघर्षात पाकिस्तानने चिनी लढाऊ विमान जे-10 चा वापर केला होता. याचबरोबर पाकिस्तानने चिनी एचएक्यू-9 सिस्टीम आणि क्षेपणास्त्रांच वापर केला होता. या संघर्षात भारतीय वायुदलाने पाकिस्तानचे मोठे नुकसान घडवून आणले होते. याचमुळे चीन आता पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी स्वत:चे नवे अस्त्र लवकर देऊ पाहत आहे.









