अहवालात दावा : 100 हून अधिक प्रकरणे उघड : एफबीआय-संरक्षण मंत्रालय अलर्टवर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीन कोणत्याही देशाची हेरगिरी करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. सध्या अमेरिकेत अशा घटना उघड झाल्या असून चीनच्या या कृतीने संताप व्यक्त केला जात आहे. अलीकडच्या काळात चीनने आपल्या नागरिकांना अमेरिकेत पर्यटक म्हणून पाठवले आहे. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून अमेरिकन लष्करी तळांवर आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर हेरगिरी केली गेली आहे. चीनच्या या कारनाम्यांमुळे एफबीआय आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय सतर्क झाले आहे.
सध्या अमेरिका आणि चीनमधील संबंध अतिशय तणावपूर्ण बनले असतानाच हेरगिरीसंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालानुसार, चीन दीर्घकाळापासून चिनी पर्यटकांच्या माध्यमातून अमेरिकेत हेरगिरी करत आहे. ही गुप्तहेरी अजूनही सुरू आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. चीनने पर्यटक म्हणून पाठवलेल्या हेरांच्या माध्यमातून अलिकडच्या वर्षांत एक-दोन नव्हे तर 100 हून अधिक हेरगिरीची प्रकरणे उघड झाली आहे. या प्रकरणांवरून चीन आपल्या छुप्या योजनांमध्ये यशस्वी होत असल्याचे दिसून येते.
अलीकडेच गुप्तहेरीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय, एफबीआय आणि इतर गुप्तचर संस्थांची बैठक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये हेरगिरीच्या छुप्या प्रकरणांवर बंदी घालण्यासाठी चर्चा करण्यात आली. अनेकवेळा चिनी पर्यटक अमेरिकन लष्करी तळात न तपासता घुसले आहेत. चिनी पर्यटक न्यू मेक्सिकोमध्ये यूएस क्षेपणास्त्र श्रेणीत प्रवेश करतात. एकदा तर त्यांनी स्कूबा डायव्हिंगच्या बहाण्याने फ्लोरिडातील रॉकेट लॉन्च साईटपर्यंतही धडक मारल्याची प्रकरणे उघड झाली आहेत.
पर्यटकांच्या वेशात हेरगिरी करणाऱ्या चिनी हेरांनी अनेक मार्गांनी आपले ध्येय पार पाडले आहे. लष्करी तळाच्या आत मॅकडोनाल्ड किंवा बर्गर किंग आऊटलेट आहेत. गुगल मॅपचा वापर करून चिनी नागरिक या आऊटलेट्सपर्यंत पोहोचायचे. चिनी हेर आपली भूक भागवण्यासाठी आले आहेत असे सर्वांना वाटत होते, पण ते शांतपणे आपले ध्येय पार पाडून निघून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण आणि कमी लोकसंख्या असलेल्या भागात हेरगिरीच्या बहुतांश घटना घडल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मात्र, अमेरिकेचे संरक्षण आणि गृह मंत्रालयाकडे यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.









