पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची अजब मागणी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत चीन आणि रशियालाही समाविष्ट करावे अशी अजब मागणी पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी रशियन मीडिया रिया नोवोस्तीला दिलेल्या मुलाखतीत भारताचे पंतप्रधान मोदी खरे बोलत आहेत की खोटे बोलत आहेत याची आंतरराष्ट्रीय पथकाने चौकशी करावी, असे म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला. यामध्ये, शोध दरम्यान सापडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांना आधार म्हणून घेतले आहे.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले आहेत. भारताच्या राजनैतिक हल्ल्यामुळे पाकिस्तान धास्तावला असून त्यांच्याकडून आगळीवेगळी विधाने केली जात आहेत. भारताने प्रथम या घटनेचा दोषी कोण आहे? हे शोधून काढावे. नुसत्या भाषणांचा आणि पोकळ विधानांचा काहीही परिणाम होणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी त्यांनी रशिया, चीन आणि इतर पाश्चात्य देशांकडून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
भारताने कोणत्या आधारावर शेजारच्या देशावर हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे? असा प्रश्नही आसिफ यांनी केला. रशिया, चीन किंवा पाश्चात्य देश या संकटात खूप सकारात्मक भूमिका बजावू शकतात. ते एक तपास पथक देखील स्थापन करू शकतात, असेही ते पुढे म्हणाले.









