उपराष्ट्रपतींच्या अमेरिका दौऱ्यामुळे जिनपिंग संतप्त
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनने तैवानभोवती पुन्हा सैन्य पाठवले आहे. नुकतेच तैवानचे उपराष्ट्रपती अमेरिकेला गेल्यामुळे शी जिनपिंग संतापले आहेत. चीनने तैवानच्या दिशेने लढाऊ विमाने, नौदलाची जहाजे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रप्रणाली तैनात करत युद्धसराव चालवल्याचा दावा केला जात आहे. तैवानने या कृतीला रोखठोक शाब्दिक प्रत्युत्तर देत चीनची ‘लष्करीवादी मानसिकता’ यातून अधोरेखित होत असल्याचा हल्लाबोल केला आहे.
चीन पुन्हा तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. तैवानच्या सीमेवर चीनचे हवाई आणि सागरी सैन्य संयुक्तपणे सराव करत आहेत. चिनी लष्कराच्या ईस्टर्न थिएटर कमांडकडे या भागाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धसरावाचा फोकस हवाई आणि समुद्रातील जागा हस्तगत करणे आणि लढाऊ क्षमतांची चाचणी करणे हाच आहे. चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने 30 सेकंदांचा एक व्हिडिओही जारी केला असून त्यामध्ये हवाई आणि सागरी सेना एकमेकांना मदत करत सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनने आपल्या ताफ्यातील नाशक, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, पूर्व चेतावणी देणारी विमाने, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे सोबत आणली आहेत.
42 चिनी लढाऊ विमाने, आठ युद्धनौका या लष्करी सरावात सहभागी झाल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच 26 लढाऊ विमानांनी दोन्ही देशांना वेगळे करणारे क्षेत्र ओलांडल्याचा दावा केला जात आहे. हा भाग अनधिकृत सीमा म्हणूनही ओळखला जातो.









