चीनला दिलेले अन्य प्रकल्पही रोखले
वृत्तसंस्था/ मनीला
फिलिपाईन्सने चीनसोबत बेटांवरून झालेल्या वादानंतर भारताचे अनुकरण करत अनेक महत्त्वपूर्ण चिनी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे. यात 5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याचे तीन रेल्वे प्रकल्प देखील सामील आहेत. हे सर्व रेल्वेप्रकल्प चिनी कर्जाद्वारे निर्माण केले जाणार होते. याचबरोबर फिलिपाईन्सने रस्तेनिर्मितीत चिनी कंपन्यांच्या एंट्रीवरही बंदी घातली आहे. फिलिपाईन्स आता या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्यासाठी अन्य आशियाई देशांसोबत चर्चा करत आहे.
चीनने मागील काही महिन्यांपासून फिलिपाईन्सला दक्षिण चीन समुद्रातील सेकंड थॉमस शोल नावाच्या बेटावर जाण्यापासून रोखण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी चिनी तटरक्षक दलाच्या जहाजांनी या बेटावर रसदपुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या फिलिपाईन्सच्या दोन नौकांना टक्कर मारली होती.
फिलिपाईन्सचे यापूर्वीचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांच्या कार्यकाळात चीनने तीन रेल्वे प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. दुतेर्ते यांनी चीनसोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याला महत्त्व दिले होते. तर वर्तमान अध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला प्रदान करण्यात आलेल्या प्रकल्पांची समीक्षा केली आहे. मिंडानाओ रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी चिनी सहाय्य घेण्यास फिलिपाईन्स इच्छुक नसल्याचे देशाचे अर्थसचिव बेंजामिन डिओकोनो यांनी चीनला कळविले आहे. या प्रकल्पात 100 किलोमीटरची परिवहन प्रणाली सामील असून ती माजी अध्यक्ष दुतेर्ते यांच्या मतदारसंघातून जाणार होती. या प्रकल्पासाठी 1.96 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित होता.









