लवकरच चीनमध्ये नसणार एकही भारतीय पत्रकार
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये कार्यरत असलेल्या भारताच्या अखेरच्या पत्रकारालाही देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा पत्रकार पीटीआय या वृत्तसंस्थेचा असून चीनमधील वास्तव्याशी संबंधित त्यांच्या दस्तऐवजांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. भारतात आमच्या पत्रकारांना योग्य वागणूक दिली जात नाही, यामुळे आम्हाला देखील कठोर पाऊल उचलणे भाग असल्याचा चीनचा दावा आहे. परंतु चीनच्या भूमिकेत सोमवारी काही प्रमाणात नरमाई दिसून आली. दोन्ही देश हा तणाव दूर करण्यासाठी सुवर्णमध्य काढतील अशी अपेक्षा असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. चीनने भारतापूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना देश सोडण्याचा आदेश दिला होता.
मागील काही वर्षांमध्ये चीनच्या पत्रकारांना भारतात योग्य वागणूक मिळालेली नाही. चीनचे पत्रकार भेदभावाचे शिकार ठरले आहेत. तरीही भारत आमच्या पत्रकारांना व्हिसा प्रदान करत राहिल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सोमवारी म्हटले आहे.
भारतात आमच्या पत्रकारांसमोर निर्माण केलेल्या समस्या दूर करण्यात येतील अशीही आम्ही अपेक्षा करतो. दोन्ही देशांचे पत्रकार परस्परांच्या देशांमध्ये मुक्तपणे काम करू शकतील अशी स्थिती निर्माण केली जाईल अशीही आम्हाला अपेक्षा असल्याचे वांग यांनी नमूद केले आहे.
दोन महिन्यांपूर्वीपर्यंत चीनमध्ये भारताचे एकूण 3 पत्रकार कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी चीनच्या प्रशासनाने 2 पत्रकारांचा व्हिसा दस्तऐवज आणि उर्वरित आवश्यक कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता. यामुळे या दोन्ही पत्रकारांना मायदेशी परतावे लागले होते. भारताकडून आमच्या पत्रकारांना अशाचप्रकारची वागणूक दिली जाते असे चीनकडून म्हटले गेले होते. भारताने दोन चिनी पत्रकारांच्या व्हिसाचे नूतनीकरण केले नव्हते. 2020 नंतर भारताने कुठल्याही चिनी पत्रकाराला व्हिसा प्रदान केलेला नाही, तर एकेकाळी भारतात 14 चिनी पत्रकार कार्यरत होते असे चीनचे म्हणणे आहे.
भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव
भारताने या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी कुठलेच पाऊल उचललेले नाही. भारत सरकारने याप्रकरणी परस्पर सन्मानाच्या आधारावर तोडगा काढावा अशी आमची इच्छा आहे. चर्चेतून यावर तोडगा काढला जाऊ शकतो असे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग यांनी म्हटले आहे. मे महिन्यात एससीओच्या बैठकीसाठी भारताने चिनी पत्रकारांना तात्पुरत्या स्वरुपाचा व्हिसा प्रदान केला होता. चीन आमच्या पत्रकारांना स्वत:च्या क्षेत्रात काम करू देईल अशी अपेक्षा आहे. चिनी पत्रकारांसोबत भारतात कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही, परंतु चीन आमच्या पत्रकारांच्या कार्यात अडथळे निर्माण करत असल्याची भूमिका भारताच्या विदेश मंत्रालयाने मागील आठवड्यात मांडली होती.
चीनचा दुटप्पीपणा
चीन सरकार भारतीय पत्रकारांप्रकरणी दुटप्पीपणाची भूमिका अवलंबू पाहत आहे. भारताच्या केवळ तीन पत्रकारांना चीनमध्ये काम करण्याची मंजुरी दिली जात होती, परंतु स्वत:च्या मर्जीनुसार हवे तितके चिनी पत्रकार भारतात रहावेत अशी चीनची इच्छा आहे. परंतु भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्याने चीनची कोंडी झाली आहे. अशाच प्रकारच्या मुद्द्यांवरून चीनचा ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसोबतही वाद झाला आहे.









