सात्विक-चिरागच्या कामगिरीवर अधिक लक्ष
वृत्तसंस्था / चेंगझोयु (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या चायना खुल्या सुपर 1000 दर्जाच्या पुरुष-महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पुरुष दुहेरीची भारतीय जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहील. एकेरीमध्ये लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू सूर मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनची विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा पॅरिसमध्ये 25 ते 31 ऑगस्टदरम्यान होत असल्याने चीनमधील ही स्पर्धा भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंना सूर मिळविण्यासाठी महत्त्वाची राहील. चीनमधील ही स्पर्धा विश्वबॅडमिंटन टूरवरील प्रतिष्ठेची समजली जाते. 2025 च्या बॅडमिंटन हंगामात 15 वी मानांकीत जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. जानेवारीतील इंडिया खुल्या तसेच मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर सात्विकला तंदुरुस्तीची समस्या निर्माण झाली आणि चिरागला पाठदुखीच्या अडचणीला तोंड द्यावे लागले. प्रकृती नादुरुस्तीमुळे या दोघांनाही अनेक आठवडे बॅडमिंटनपासून अलिप्त रहावे लागले. दरम्यान सात्विक आणि चिराग यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपले पुनरागमन केले. तसेच नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. सिंगापूरमधील स्पर्धेत या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सात्विक आणि चिरागला रौप्य पदकाच्या लढतीमध्ये हार पत्करावी लागली होती.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सात्विक आणि चिराग या जोडीची सलामीची लढत जपानच्या मित्सुहाशी आणि ओकामुरा यांच्याशी होणार आहे. चीनमधील या स्पर्धेत एकूण 20 लाख डॉलर्सची बक्षीसाची रक्कम ठेवण्यात आली आहे. एकेरीमध्ये भारताचे लक्ष्य सेन, प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू सूर मिळविण्यासाठी गेल्या काही स्पर्धांमध्ये झगडत आहेत. पुरुष एकेरीच्या मानांकनात लक्ष्य सेन सध्या 18 व्या स्थानावर असून तो चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत 23 वर्षीय लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मध्यंतरी त्याला पाठदुखीची तसेच खांदा दुखीची समस्या चांगलीच भेडसावत होती. गेल्या आठवड्यात झालेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचे आव्हान दुसऱ्याच फेरीत समाप्त झाले होते. लक्ष्य सेनचा चीनमधील या स्पर्धेत सलामीचा सामना चीनच्या फेंगबरोबर होणार आहे.
2023 च्या बॅडमिंटन हंगामात विश्वचॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारा तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा एच. एस. प्रणॉय गेल्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही. मानांकन यादीत तो सध्या 35 व्या स्थानावर आहे. चीनमधील या स्पर्धेत प्रणॉयचा सलामीचा सामना जपानच्या वटांबेशी होणार आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना जपानच्या टोमोका मियाझेकीशी होईल. या स्पर्धेत उनाती हुडा, अनुपमा उपाध्याय, पांडा भगिनी, रोहन कपूर व ऋत्विका शिवानी ग•s भारताचे प्रतिनिधीत्व करतील.









