वृत्तसंस्था /काबूल
अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीदरम्यान चीनने काबूलमध्ये स्वत:चा पूर्णवेळ राजदूत नियुक्त केला आहे. याचबरोबर तालिबानच्या राजवटीत अशाप्रकारचे पाऊल उचलणारा चीन पहिला देश ठरला आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्यापासून तालिबान आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी धडपड करत आहे. परंतु अद्याप कुठल्याही देशाने तालिबानला मान्यता दिलेली नाही. काबूलमध्ये स्वत:चा पूर्णवेळ राजदूत नियुक्त करून चीन या दिशेने पाऊल टाकलले आहे. चीनचे नवे राजदूत झाओ जिंग यांनी पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद आणि विदेशमंत्री शेख अमीर खान मुत्तकी यांची भेट घेतली असल्याची माहिती तालिबनाच्या प्रवक्त्याने दिली आहे. तर चीनने राजदूताच्या नियुक्तीला सामान्य प्रक्रियेचा हिस्सा ठरविले आहे.
चीनच्या दूतावासाकडून एक वक्तव्य जारी करत अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीसोबत संवाद वाढविण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला करण्यात आले आहे. तसेच देशात एक आधुनिक धोरण स्वीकारून दहशतवादाशी लढण्यास मदत करावी असे चीनने म्हटले आहे. अफगाणिस्तानात यापूर्वी जे घडले त्यापासून धडा घेण्याची गरज आहे. दहशतवाद विरोधी लढाईत दुहेरी मापदंड त्यागण्यात यावेत. विदेशात गोठविण्यात आलेली अफगाणिस्तानची संपत्ती उपलब्ध करून देण्यात यावी आणि तालिबानवरील निर्बंध हटविण्यात यावेत असे चीनने म्हटले आहे.









