लक्ष्य सेन, सात्विक-चिरागचे हंगामातील पहिला किताब मिळविण्याकडे लक्ष
वृत्तसंस्था/ शेन्झेन, चीन
चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा आज मंगळवारपासून सुरू होत असून नुकतीच अंतिम फेरी गाठल्याने उत्साहात असलेला लक्ष्य सेन त्याच्या नव्याने मिळालेल्या लयीवर स्वार होण्याचा प्रयत्न करेल तसेच सात्विकसाईराज रान्कीरे•ाrr आणि चिराग शेट्टी हे देखील त्यांचे सातत्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतील.
खराब फॉर्म आणि फिटनेसच्या समस्यांशी दीर्घकाळ झुंजल्यानंतर नुकत्याच संपलेल्या हाँगकाँग ओपनच्या माध्यमातून दोन वर्षांत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या लक्ष्यचा सलामीचा सामना फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हविऊद्ध होईल. पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथे स्थान पटकावलेला अल्मोराचा हा 24 वर्षीय खेळाडू सर्वोत्तम सुरात राहिलेला नसून अनेक वेळा स्पर्धांतून लवकर बाहेर पडलेला आहे. परंतु हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना त्याने सर्व काही बदलले. मी फक्त स्वत:वर अधिक विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. मी पहिल्या दिवसापासून जी प्रक्रिया करत होतो तीच कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, असे लक्ष्य म्हणाला.
आठवे मानांकित सात्विक आणि चिराग हे या हंगामात भारताचे सर्वांत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणारे खेळाडू आहेत. त्यांनी सहा उपांत्य फेऱ्या गाठलेल्या आहेत, जागतिक स्पर्धेतील दुसरे कांस्यपदक जिंकलेले आहे आणि गेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये एक चमकदार कामगिरी केली आहे. 2025 च्या पहिल्या मुकुटाच्या शोधात असलेले आशियाई खेळांतील हे विजेते मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि रॉय किंग याप यांच्याविऊद्ध सुऊवात करतील. हाँगकाँग ओपनमधील अंतिम फेरी हा 16 महिन्यांतील त्यांचा पहिलाच अंतिम सामना होता आणि भारतीय खेळाडू कमी पडले असले, तरी या कामगिरीने त्यांची प्रगती अधोरेखित केली आहे. कारण ते पुन्हा एकदा जगातील अव्वल जोड्यांना आव्हान देण्याची तयारी करत आहेत.
गेल्या आठवड्यात जपानच्या कोडाई नारोकाला धक्का देणारा युवा आयुष शेट्टी सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या चाऊ टिएन चेनचा सामना करणार असून या स्पधेंतून आणखी एक मजबूत धाव नोंदविण्याचा तो प्रयत्न करेल. गेल्या जूनमध्ये यूएस ओपन सुपर 300 मध्ये आयूषने त्याच्या पहिल्या जागतिक बॅडमिंडन महासंघ जेतेपदाकडील वाटचालीत सदर अनुभवी खेळाडूला हरवले होते.
महिला एकेरीत दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू डेन्मार्कच्या ज्युली डावल जेकोबसेनचा सामना करताना तिचा सर्वोत्तम खेळ पुन्हा एकदा करण्याची आशा करेल. 14 व्या क्रमांकावर असलेल्या 30 वर्षीय सिंधूने जागतिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचताना चीनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वांग झी यीला धक्का दिला होता. परंतु लाइन क्रिस्तोफरसनविऊद्ध तिला पराभव पत्करावा लागला होता.









