जगभरातील प्रतिभावंतांसाठी चीनचे दरवाजे उघडणार : अमेरिकेच्या एच-1बी व्हिसाला प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनने जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षित करण्यासाठी ‘के-व्हिसा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. नवीन व्हिसा 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसावर मोठ्या प्रमाणात शुल्क लादल्याने जगभरात घबराट पसरली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे विशेषत: भारताला मोठा धक्का बसला आहे. परंतु अमेरिका परदेशी कामगारांसाठी आपले दरवाजे बंद करत असताना, चीनने जागतिक प्रतिभेसाठी आपले दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांच्या एच-1बी व्हिसाला विरोध करताना, चीनने ‘के व्हिसा’ला त्याच्या व्हिसा श्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिसाद्वारे, चीन जगभरातील तरुण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना आकर्षित करण्याची तयारी करत आहे. या व्हिसासाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अधिक माहिती चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांकडून जाहीर केली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
चीन सरकारने ऑगस्टमध्ये या निर्णयाला मान्यता दिली होती. आता अमेरिकेने एच-1बी व्हिसासाठी शुल्क अंदाजे 6 लाखांवरून 88 लाख रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे नव्याने अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड होण्याचा धोका आहे. त्याच अनुषंगाने आता नवतरुणांना चीनकडे वळावे लागेल. यासंदर्भात एच-1बी व्हिसाचा पर्याय म्हणून के-व्हिसाचा विचार केला जात आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, के-व्हिसा हा तरुण आणि कुशल व्यावसायिकांसाठी संबंधित असून तो प्रामुख्याने एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) क्षेत्रातील संशोधन करणाऱ्यांसाठी किंवा शिकणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
चीन सध्या 12 प्रकारचे व्हिसा जारी करतो. सध्या आर-व्हिसा किंवा झेड-व्हिसा चीनमध्ये काम करण्यासाठी वापरला जातो. झेड-व्हिसाची वैधता एक वर्षाची आहे, तर आर-व्हिसाची वैधता फक्त 180 दिवसांची आहे. आर-व्हिसाला कोणतेही शुल्क नाही, परंतु त्याची अर्ज प्रक्रिया लांब आणि गुंतागुंतीची असल्यामुळे ती यशस्वी होऊ शकली नाही. दरम्यान, के-व्हिसा परदेशी लोकांना चीनमध्ये जास्त काळ राहण्याची परवानगी देणार आहे. चीनमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या परदेशी व्यक्तीला प्रथम चिनी कंपनी किंवा संस्थेकडून नोकरीची ऑफर किंवा प्रायोजकत्व मिळल्यानंतर के-व्हिसा प्राप्त होऊ शकेल. यामुळे परदेशी व्यावसायिकांना अर्ज करणे सोपे होईल. यासाठी शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे थेट अर्ज करता येतील. चीनने के-व्हिसाच्या शुल्काबाबत कोणतीही अधिकृत घोषणा सध्या केलेली नाही.
परदेशी प्रतिभेसाठी चीनच्या दोन योजना
अहवालांनुसार, 2035 पर्यंत चीन जागतिक तांत्रिक शक्ती बनण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हे साध्य करण्यासाठी त्याला परदेशी तज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी चीनने दोन कार्यक्रम सुरू केले आहेत. प्रतिभावंत तरुण शास्त्रज्ञ कार्यक्रम हा आशिया आणि आफ्रिकेतील 45 वर्षांपर्यंतच्या संशोधकांना चीनमध्ये काम करण्याची आणि संशोधन करण्याची परवानगी देतो. तर उत्कृष्ट तरुण शास्त्रज्ञ निधी प्रकल्प हा कार्यक्रम 40 वर्षांपर्यंतच्या उच्च श्रेणीतील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना चीनमध्ये येऊन काम करण्यास प्रोत्साहित करतो. शिवाय, प्रमुख चिनी विद्यापीठे आणि संशोधन संस्था उत्कृष्ट विद्यार्थी आणि संशोधकांना आकर्षित करण्यासाठी उच्च पगार आणि बोनस देत आहेत.









