अमेरिकेला प्रत्युत्तरासाठी अन्य देशांना संघटनेत सामील करण्याची शिफारस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिक्स या संघटनेद्वारे चीन जगात स्वत:चा दबदबा वाढवू पाहत आहे. याकरता चीन वेगाने ब्रिक्स संघटनेचा विस्तार करण्याच्या विचारात आहे. तर या संघटनेचे अन्य सदस्य भारत आणि ब्राझील याला विरोध दर्शवित आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स देशांची परिषद होणार आहे. या परिषदेच्या तयारींवरून होत असलेल्या चर्चेत चीनने अन्य देशांना संघटनेत सामील करण्याची शिफारस केली आहे.
चीन अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना ब्रिक्समध्ये सामील करत तेथील स्वत:चा प्रभाव वाढवू पाहतोय. तसेच अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिक्सद्वारे चीन अन्य देशांशी संबंध वृद्धींगत करण्याच्या प्रयत्नात आहे. तर भारत आणि ब्राझील या प्रक्रियेला विचारपूर्वक पुढे नेण्याच्या मताचे आहेत.
ब्रिक्सची पाश्चिमात्य देशांना भीती
सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इराण समवेत अनेक देशांनी ब्रिक्समध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त याकरता अर्जही केला आहे. तर ब्रिक्स संघटना मजबूत झाल्यास वेगवेगळ्या व्यासपीठांवरील स्वत:साठीचे आव्हान वाढणार असल्याची भीती अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांना आहे. पाश्चिमात्य देशांना ब्रिक्सच्या वाढत्या प्रभावाची चिंता वाटू नये अशी ब्राझीलची भूमिका आहे. तर अन्य देशांना ब्रिक्स संघटनेत केवळ निरीक्षकाची भूमिका देण्यात यावी असे भारताचे म्हणणे आहे. कुठल्याही देशाला संघटनेचे सदस्यत्व देण्यासाठी सर्व सदस्य देशांदरम्यान सहमती आवश्यक आहे. सध्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका याचे सदस्य आहेत.
भारताच्या विरोधानंतर मसुदा
संघटनेच्या विस्तारावर भारताने विरोध दर्शविल्यानंतर एक मसुदा तयार करण्यात आला आहे. संघटनेत नव्या सदस्यांना जोडण्याशी संबंधित नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांवर पुढील महिन्यात ब्रिक्स परिषदेदरम्यान चर्चेनंतर शिक्कामोर्तब होणार आहे. ब्रिक्समध्ये नवे सदस्य जोडले जाणार असतील तर ते उदयोन्मुख अर्थवयस्था किंवा लोकशाहीवादी असावेत, उदाहरणार्थ नायजेरिया आणि अर्जेंटीना असे भारताने म्हटले आहे. हुकुमशाही किंवा एखाद्या घराण्याचे शासन असलेल्या देशांना संघटनेत सामील करण्यास भारताचा विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील महिन्यात याच मुद्द्यावरून सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलामन यांच्याशी चर्चा केली होती.
पाकिस्तानही इच्छुक
आर्थिक संकटाला सामोरा जाणारा पाकिस्तान देखील ब्रिक्स संघटनेत सामील होण्यासाठी इच्छुक आहे. पाकिस्तानचे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत संघटनेत सामील होण्याच्या मागणीला पाकिस्तान जोर देऊ शकतो. परंतु या संघटनेत पाकिस्तानला स्थान मिळणे तूर्तास अशक्य आहे. पाकिस्तानच्या प्रवेशाला भारताचा विरोध असणार आहे. पाकिस्तानला स्थान मिळाल्यास भारत या संघटनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. ब्रिक्समधून भारताने अंग काढून घेतल्यास ही संघटना कमकुवत होणार आहे.









