वृत्तसंस्था/ हांगझोयू
रविवारी येथे झालेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत यजमान चीनने विजेतेपद तर भारतीय महिला हॉकी संघाने उपविजेतेपद पटकाविले. पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्याची संधी भारतीय महिला संघाने गमाविली.
रविवारचा हा अंतिम सामना एकतर्फीच झाला. पहिल्या मिनिटातच भारताने आपले खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडले. 39 व्या सेकंदाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर नवनीत कौरने शानदार गोल केला. त्यानंतर चीनला 3 मिनिटांच्या कालावधीत पाठोपाठ 2 पेनल्टी कॉर्नर मिळले पण भारताच्या भक्कम बचावफळीने चीनची आक्रमणे थोपविली. चीनने आपल्या खेळाच्या डावपेचात बदल करुन भारतीय बचावफळीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सामन्यातील दुसऱ्या सत्रात चीनला पाठोपाठ 2 पेनल्टी कॉर्नर मिळाले. 21 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर चीनच्या झिक्साई ओयूने गोल नोंदवून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
सामन्यातील शेवटच्या दोन सत्रांमध्ये चीनच्या अचूक आक्रमणासमोर भारताची बचावफळी कोलमडली. त्याचा लाभ चीनने पुरेपूर उठविला. 51 व्या मिनिटाला मिराँग झोयूने चीनचा दुसरा गोल नोंदविला. झोयूने भारताच्या बचावफळीतील दोन खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत हा मैदानी गोल केला. हाँग लीने 52 व्या मिनिटाला मैदानी गोल करुन चीनची आघाडी 3-1 अशी वाढविली. दरम्यान जीयाक्वी झाँगने 53 व्या मिनिटाला चीनचा चौथा गोल केला.
चीनच्या महिला हॉकी संघाने आतापर्यंत तीन वेळा आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली आहे. 1989 साली हाँगकाँगमध्ये तर 2009 साली बँकॉकमध्ये झालेल्या या स्पर्धेत चीनने विजेतेपद मिळविले होते. 2025 साली आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकून चीनच्या महिला संघाने आता बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाने 2026 साली होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत भारताला जेतेपद मिळविता आले नाही. त्यामुळे आगामी महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी भारतीय महिला संघाला अन्य पात्र फेरी स्पर्धेमध्ये खेळावे लागणार आहे.









