तेल अवीव :
इस्रायल डिफेन्स फोर्सचे लेफ्टनंट कर्नल किंवा कुठल्याही सैन्याधिकारी आता चीननिर्मित इलेक्ट्रिक ‘एटीटीओ बीवायडी 3’ कारमधून फिरणार नाही. सायबर आणि माहिती सुरक्षा तज्ञांच्या सातत्याने दबावानंतर संरक्षण मंत्रालयाने आयडीएफ अधिकाऱ्यांना चिनी कार्सचा वापर बंद करण्यास सांगितले आहे. तेल अवीवमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी सध्या अनेक चिनी इलेक्ट्रिक एमजीजेडएस मॉडेल कार्सचा वापर केला जात आहे. तसेच अनेक अधिकाऱ्यांना यापूर्वी 600 चिनी इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर चेरी टिग्गो 8 कार्सचा पुरवठा करण्यात आला होता. आयडीएफच्या अधिकाऱ्यांना आता उच्चसुरक्षा प्राप्त आयडीएफ ठिकाणांमध्ये चिनी वाहनासह प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. आयडीएफच्या ठिकाणांमध्ये प्रवेशासाठी आपत्कालीन ई-कॉल प्रणाली आणि दुर्घटनेच्या स्थितीत स्वयंचलित स्वरुपात आपत्कालीन हॉटलाइनशी संपर्क करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या प्रणालीला पूर्णपणे डिस्कनेट करण्यात आले आहे. चिनी कार्सना गुप्त माहिती जमविणारी प्रणाली मानले जात आहे. यामागील कारण संचार क्षमतांसोबत कार्समधील अत्याधुनिक सेंसर सामील असणे आहे. ही प्रणाली कारमध्ये बसलेले लोक आणि आसपासच्या भागांची मोठ्या प्रमाणात व्हिज्युअल, ऑडिओ आणि बायोमेट्रिक माहितीही एकत्र करू शकते. तसेच ही माहिती थेट चीनमध्ये सर्वरवर पाठवू शकते. चिनी कार्स अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे तेथील प्रशासनाने मागील वर्षी म्हटले होते. चिनी कार्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत, असे तेथील वाणिज्य सचिव जीना रायमेंडो यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने संरक्षण अधिकाऱ्यांना चिनी कार्सचा वापर करण्यास मनाई केली आहे.









